NCT NCT मातीपासून पणती बनविण्याकडे कुंभारांची पाठ, बाहेरून आणुन विकण्यावरच भर,इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्याचा प्रकाश होतोय मंद

मातीपासून पणती बनविण्याकडे कुंभारांची पाठ, बाहेरून आणुन विकण्यावरच भर,इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्याचा प्रकाश होतोय मंद


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे)-
 दिवाळीच्या प्रकाशाचे पर्व अगदीच तोंडावर येऊन ठेपले असून,सगळीकडेच घराघरामधून दिवाळीच्या तयारीची लगबग दिसून येत आहे.दिवाळीत रांगोळी आणि पणत्याविना या उत्सवाची चकमक काही अपूर्णच असते.
      पुर्वी कुंभारवाड्यात 'फिरत्या चाकावरती देशी पणतीला आकार' अशा पणत्या तयार करण्याची लगबग दिसून येत असे.कुंभारवाड्यात मोठ्या प्रमाणात मातीची दिवे बनविले जायाचे.पण आता काळ बदलला असून.कुंभार लोक पणत्या करण्याऐवजी बाहेरून आणून विकण्यावरच अगदी भर देत आहेत.त्याला चायनामेड विद्युत पणत्याचीही‌‌ जोड मिळत आहे.
         दुसरीकडे आधुनिक युगात वेगवेगळ्या प्रकारच्या पणत्या विक्रीला येत असतात.विशेषतः परराज्यातूनही सुबक पणत्या येत असल्या तरीही दिवाळीच्या सणाला मात्र मातीच्याच पणत्या लावून घर उजळण्याची आजही परंपरा ग्रामीण भागात गेली अनेक शतके सुरु आहे.ऐन दिवाळीत महागाई ने कमरडे मोडले आहे.अशा परिस्थितीत दिवाळी जवळ आल्याने कुंभार समाज दिवे बनविण्याऐवजी पणत्या बाहेरून आणून विकण्यातच व्यस्त दिसत आहे.
          कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात  कुंभार व्यवसायातून तर पणत्या बनविणे हा व्यवसाय तर जवळ जवळ हद्दपार झाला आहे.कुठेही पणत्या तयार केल्या जात नाहीत.पुर्वी मातीच्या पणत्या बनविताना आई- वडिलांसोबत मुलेही मातीची दिवे,भांडे, खेळणी,लक्ष्मीच्या मुर्त्या, किल्ल्यावर ठेवण्याची चित्रे बनविण्यास मदत करत असत.कोणी माती मळण्यात व्यस्त असे,तर कोणी हात चाकावर मातीची भांडी घडवत असे.पण सध्या तालुक्यात हे चित्र आज कुठेही दिसत नाही.
         दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिवे लावले जातात.अंगणात दिवा लावला की, 'दिवाजळे आणि विघ्णं टळे' अशी म्हण आजही कायम आहे.
 उदरनिर्वाहाचे संकट !
आधुनिकतेच्या युगात दिव्याची जागा विद्युत दिव्यांनी घेतली आहे,अशा स्थितीत कुंभार कारागिरासमोरील उदरनिर्वाहाचे संकट अधिक गडद झाले आहे. चिनी दीपमाळांनी तर या कुंभाराचे अधिकच नुकसान केले आहे.वर्षभर या सणाची वाट पाहणाऱ्या कुंभाराची दिवाळी आता पूर्वीसारखी राहिलेली नाही.नवीन पिढी कुंभारी कामापासून तर पार दूर जात आहे.दिवाळी आणि उन्हाळ्यात मातीपासून बनलेल्या भांड्यांना मागणी वाढत असते,पण बाजारपेठेतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या चकाकीत मातीच्या दिव्याचा प्रकाश मंद होत आहे. नागरिक हे मातीच्या पणत्याचा वापर केवळ पूजेसाठी करीत आहेत,त्यामुळे त्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नाही.त्यामुळे कुंभार समाजातील नवीन पिढी ह्या कामापासून दूर जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
        ---- दत्तात्रय कुंभार.
            कवठेमहांकाळ.)