नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात गृहिणी घरात नवनवीन प्रकारच्या हायटेक वस्तूंना प्राधान्य देतात.पण असे असले तरी दिवाळी सणासाठी सिंधी अथवा केतकीच्या पानांपासून तयार होणाऱ्या झाडूलाच खरेदीला प्राधान्य दिले जाते. लक्ष्मीपूजनाला या झाडूला मोठा मान असतो.सिंधी अथवा केतकीच्या पानांपासून झाडू निर्माण करणाऱ्या कारागिरांनाही दिवाळीतच मोठा रोजगार उपलब्ध होतो.
अगदी श्रीमंतांपासून झोपडीतील गरीबांपर्यंत सर्वच लोक दिवाळीत हा झाडू आवर्जून खरेदी करतात.यामुळे दिवाळी निमीत्त झाडूला मोठी मागणी होत असते.याच काळात कारागीरांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होतो.इतर वेळी या झाडूला कुणीही विचारत नसल्याने कारागीरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असतो.सध्या आधुनिक विविध प्रकारच्या झाडूनी आपली छाप ग्राहकांवर पाडली आहे.यामुळे पूर्वी घरात दिसणाऱ्या केरसुणी झाडूचे महत्त्व कमी होत चालले आहे.परिणामी ग्रामीण या कारागीरांवर संक्रांत आली आहे.
पूर्वी सिंधी अथवा केतकीच्याच्या झाडाच्या पानोळ्यापासून झाडू बनविण्याचा व्यवसाय कित्येक पिढ्यांपासून सुरू होता कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे,तिसंगी,जाखापुर,कुची,नागज,ढालगाव,शिरढोण परीसरात हे झाडू मोठ्या प्रमाणात तयार केले जात असत.पण सध्या झाडू बनिवण्यासाठी सिंधी व केतकीची झाडेही क्वचितच दिसतात.ही झाडे कमी झाल्याने पानोळ्या मिळणेही चांगलेच दुरापास्त झाले आहे.
केरसुणीला ग्रामीण भागात आजही महत्त्व असले तरी सिंधी व केतकीच्या झाडांची संख्या फारच कमी असल्याने हा व्यवसाय करणारेही अगदी हातावरील बोटावर मोजण्या इतकेच राहिले आहेत.यामुळे हा व्यवसाय सध्या आखेरची घटका मोजत आहे.परिणामी अशा कारागीरावर उपासमारीची वेळ आली आहे.या व्यवसायाकडे शासनाकडूनही दुर्लक्ष होत असल्याने घराघरात आढळणारी व घरातील लक्ष्मी म्हणून ओळख असणारी केरसुणी आता लुप्त होण्याच्या मार्गावर झाली आहे. ही केरसुणी घरात आणल्यानंतर आजही ग्रामीण भागातील लोक तिची हळद-कुंकू लावून पूजा करण्याची परंपरा कायम आहे.म्हणूनच केरसुणीला घरची लक्ष्मी मानले जाते.सध्यातर केवळ दिवाळीतच लक्ष्मी पूजनासाठी केरसुणी खरेदी करण्यात येते.इतर दिवसांसाठी आधुनिक झाडूंचाच वापर केला जात असल्याने आमच्या व्यवसायावर अवकळा आल्याचे घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील झाडू विक्रेत्ये रमेश रास्ते यांनी सांगीतले ग्रामीण भागात ज्या झाडूची पूजा होते.त्याच झाडूचा वर्षभर घरात वापर होतो.गेल्या वर्षी एका झाडूसाठी ५० ते ७० रुपये दर होता.तोच दर यंदाही कायम आहे.मात्र लागणारी दोरी व अन्य साहित्यांचे दर वाढले आहेत.त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत नफ्यात घट झाली आहे असेही रमेश रास्ते यांनी सांगितले.

