नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- चांगला सुरू असलेला कवठेमहांकाळचा महाकाली साखर कारखाना आर आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व नंतर बंद पाडला.त्यानंतर आम्ही कवठेमंकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्याही निविदा भरल्या.शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होवू दिला नाही. त्यामुळे आम्हाला नाविलाजास्तव कर्नाटकात जावे लागले ही वस्तुस्थिती आहे.साधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे.त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखूनच सद्विवेकबुद्धीने विचार करुन मतदान करा असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे (सरकार) यांनी केले.ते बोरगाव (ता कवठेमहांकाळ) येथे महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारात बोरगांव येथे बोलत होते.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा घोरपडे (सरकार) व संजय काका यांच्या समोर मांडला.सर्वच ग्रामस्थांनी कवठेमंकाळ तालुक्यात साखर कारखाना सुरू नसल्याची खंत व्यक्त केली. यावर अजितराव घोरपडे (सरकार) बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की कवठेमंकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडी मध्ये मी होतो.कारखानाही सुरळीत सुरू होता.मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला.तेव्हा मी शरद पवारांची भेट घेतली व हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली.शरद पवार यांनी त्यावर आर आर पाटील ऐकत नाहीत असे त्यांनी मला स्पष्ट सांगितले.यावर कोण आर आर पाटील त्यांचा महांकाली कारखान्याशी काय संबंध ? असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मल्टीस्टेटमुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवार साहेबांसमोर मांडल्या होत्या.मात्र तरीही हा कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पडलाच.
त्यानंतर मी स्वतः साखर कारखाना काढण्यासाठी पुढाकार घेतला.कागदपत्रही पूर्ण करून त्याची फाईल सादर केली.ही गोष्ट करताना आर आर पाटलांनी नेहमीप्रमाणेच याकामातही खोडा घातला.शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला लायसन मिळू दिले नाही.त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी जावे लागले ही शोकांतिका आहे असेही ते म्हणाले.
कवठेमंहाकाळ तालुक्याचा जर आपणास विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे असे सांगून सध्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे.लोकांना आपण विकत घेऊ शकतो अशी भावना काही जणांची झालेली आहे.मात्र कवठेमंकाळ तालुक्यातील मतदार हा जागरुक व स्वाभिमानी आहे.तो कधीही विकला जाणार नाही याचा मला विश्वास आहे.राष्ट्रवादी तीच आहे पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे आणि खरं बोलणारा व आपल्या बोलण्यावर ठाम राहणारा अजित पवार सारखा नेता आपल्याला मिळालेला आहे.त्यांच्या माध्यमातून कवठेमंकाळ तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी व संजय काका पाटील यांनी घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी संजयकाका पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.
