NCT NCT स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराचे सिसिटीव्ही फुटेज तपासा-मा.रुपाली चाकणकर

स्वारगेट बस स्थानकातील अत्याचाराचे सिसिटीव्ही फुटेज तपासा-मा.रुपाली चाकणकर


नवचैतन्य टाईम्स  पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- पुण्यातील स्वारगेट बस स्टेशनमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगाराने स्वारगेट स्टेशनमध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा भयंकर प्रकार समोर आला असुन कायम गजबजलेल्या आणि प्रवाशांची वर्दळ असलेल्या ठिकाणी घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशाकडुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारण ज्या बसमध्ये हा अत्याचार झाला ती बस स्टेशनच्या मध्यभागी असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे आरोपीचं नाव असून सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हणाले की पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, अनेक जिल्ह्यातील तालुक्यातील  आणि वाड्यावस्त्यां मधून मुली शिक्षणासाठी येतात. पुणे कायम सुरक्षित राहिलेला असुन त्यामुळेच मुलींना पुण्यात सुरक्षित वाटत असतं. स्वारगेटमध्ये घडलेली घटना धक्कादायक असून सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. संबंधित मुलीवर अत्याचार करून आरोपी फरार झाला आहे. मुलीने स्वारगेट पोलीस स्टेशनला नऊ वाजता तक्रार नोंदवली. तिथल्या पोलीस अधिकारी पूनम पाटील आणि डीसीपी अर्चना पाटील या जातीने लक्ष घातलं आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपीचे फोटो कलेक्ट करत तो कोण आहे याची माहिती पोलिसांना समजले आहे. आरोपीच्या तपासासाठी आठ पोलीस पथके तयार केले असून ग्रामीण भागात आणि स्वारगेट परिसरात तपास करत आहेत. आरोपीचा सीडीआर काढला असून लोकेशन मिळेल आणि आज किंवा उद्या आरोपीला अटक होईल, असं रूपाली चाकणकर यांनी सांगितलं आहे.
अनोळखी व्यक्तीसोबत संवाद साधू नका, संबंधित तरूणी मास्क घालून आलेल्या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी केली, कुठे जायचंय, कोणतं गाव आहे, मी सोडतो असं बोलून आरोपी त्या तरूणीला गाडीमध्ये घेऊन गेला. अनोळखी व्यक्ती बोलणं टाळा, आरडाओरडा करायला हवं, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
स्वारगेट परिसरात असे प्रकार घडत असतात. तिथे मटक्याचे अड्डे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वावरत असल्याचं काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना कधी यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार असल्याच धंगेकर यांनी म्हटले आहे.