माझे जीवन प्रवासाच्या वाटेवर आज पर्यंत अनेक प्रकारच्या मानवी स्वभावातील विविध पैलूंचा प्रभाव तसाच टिकून आहे.त्यातील काही चांगल्या प्रकृतीने मला आनंदी केले होते, तर काही दुष्ट प्रवृत्तीने अपमानित करुन निष्प्रभही केले होते.आपल्या मनातील खरी अगतिकता लक्षात घेऊन,त्यात नव विचारांचे वारे निर्माण करुन देणाऱ्या अनेक मित्रांतील मित्र म्हणून मी आदराने प्रा.आगेडकराचा आवर्जून उल्लेख करतो. व्यक्ती कशी काय असते हे प्रसंग व घटनेतून आंतरिक बोध झाल्यानंतर लक्षात येते.आणि मग आपल्या मनातील समज गैरसमजुतीचे मळभनाहीसे होते.व्यक्ती जीवनात अल्पकाळ येतात पण जीवन उदात्त भावनेने उजाळून टाकतात.ते क्षण किंवा तो प्रसंग मनाला सक्रिय उन्नत बनवतो. पर्याप्त काळात समस्या उभ्या राहतात तेव्हा पर्यायाने आधार देऊन सात्वन करणारे माझे सोबत विशिष्ट काळातआगेडकर होते. निर्भीडपणा यांच्या रक्तात मुरलेला आहे.तो त्याचा मुलभूत स्थायीभाव आहे.परिस्थितीवर मात करुन कसे रहावे हे त्यांच्या कृतीतून अनेक वेळा स्पष्ट झाले आहे.चांगले व उदात्त आहे ते मान्य करुन जीवनात त्यांनी अनेक श्रध्दास्थाने नव्याने स्थापन केली. आहेत. अगोदरचे जीवन संघर्षमय असले तरी, पराभव त्यांना मान्य नाही. सतत कार्यमग्न असणे, धडपडत रहाणे,प्रयत्न करणे हाती घेतलेल्या संशोधन असो, सामाजिक व शैक्षणिक कामात सातत्य ठेवणे, उदिष्ट साध्य करणारा हा माणूस एक छोटासे कर्मवीर आहेत.जीवनात त्यांच्या मनाविरुद्ध अनेक घटना,प्रसंग आले होते. त्यातून ते तेल लावलेल्या पैलवानासारखे सहीसलामत बाहेर पडले.यावरुन त्यांनी समाज मनाच्या नाडीचा चांगला अभ्यास केलेला दिसतो. शारीरिक संपत्तीच्या बळावर त्यांनी अनेक विरोधी संघटना उधवस्त केल्या आहेत. वासुदेव बळवंत फडके यांची जी बंडखोर वृत्ती होती तीच वृत्ती आपल्या समाजाच्या बाजूने मांडताना सभेमध्ये मला दिसत होती. देह क्षमतेपेक्षा त्यांची मानसिक शक्ती तिप्पट होती. हा माणूस निवांत आणि शांत असलेला कोणासही दिसत नाही. आपले अध्यापनाचे कार्य प्रमाण मानून अनेक विद्यार्थी संघटना,स्थापन करुन
अनेकांना अर्थसहाय्य केल्याचे मी जवळुन पाहिले आहे. प्राध्यापकांच्या मजबूत संघटना निर्माण करुन स्व बळावर टिकवून धरलेल्या आहेत. आपल्या एक नव्हे तर अनेक मित्रांवर समाजातील काही लोकांनी त्रास दिला तर हा माणूस पाठीशी भक्कम उभा राहतो. हा अनुभव अनेकांना आलेला आहे. त्यांची लोकांवर प्रेम करण्याची पध्दतअफलातून आहे.एकदा माणूस लक्षात ठेवल्यानंतर ते त्या व्यक्तीला कधीही दूर ठेवणे किंवा वाईटवागणूक देत नाहीत. गाडीवर प्रवासात असले तरी हात उंचावून व स्मित हास्य करुन ते पुढे जातील पण टाळणार नाहीत. प.पू.बुध्ददेव आणि प. पू. डॉ बाबा साहेब आंबेडकर हे त्यांच्या अस्मितेचे व जिव्हाळ्याचे विषय आहेत.त्यांनी आपल्या आयुष्याचे सर्व क्षण त्या संघटनेत ओतले आहेत.ते दोन महापुरुष होते म्हणून आम्ही आज विविध क्षेत्रात आहोत. अशी त्यांची मानसिकता आहे. आज वाईमध्ये प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा, साहित्याचा अभ्यास करणाऱ्या अनेक व्यक्तीमध्ये, जेष्ठ विचारवंत,आदरणिय श्री सतीश कुलकर्णी आणि दुसरे डॉ.आगेडकर यांचा समावेश होतो. सर्व क्षेत्रात त्यांचे नाव होत आहे. किसनवीर काॅलेजात सिनियर मराठी विभागात मी नव्याने कार्यरत असताना, माझ्या तासाला मुलांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. तो टाळ्यांचा आवाज आगेडकर सरांनी ऐकला होता. तेथून
ते माझे आदरयुक्त मन्मित्र बनले होते. त्यांनी अनेक शोध निबंध लिहिले आहेत.विशेष म्हणजे त्यांच्या जीवनगाथेवर त्यांच्याच मित्रांनी गौरवग्रंथ काढण्याचा निश्चय केलेला आहे.ही केवढ्या मोठ्या प्रेमाची पावती असावी. साहित्य निर्मिती करणाऱ्या मजसारख्या कोणत्याही लेखक कवींची पुस्तके आदराने खरेदी करतात. असा हा साहित्य व साहित्यिकांना मान देणाऱ्या माझ्या मित्रास अनेक शुभेच्छा देतो, आणि भावी आयुष्याबध्दलचा कार्यकाल
अखंड शुभ असावा असे सुशय
चिंततो.
आपला मित्र
प्रा. संभाजी रामचंद्र लावंड
उत्कर्षनगर सिध्दनाथ वाडी वाई
