नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):- यावर्षीपासून राज्यातील अंगणवाड्यात आधारशीला एक, आधारशीला दोन व आधारशीला तीन हे नव्याने विकसित केलेले अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.शालेय शिक्षण विभागाने तसा निर्णयही घेतला असून, राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या २०२० च्या अंमलबजावणीचा हा भाग असणार आहे.
राज्यात जवळपास एक लाख दहा हजार अंगणवाड्या असून त्यात शिकणाऱ्या बालकांची संख्याही साधारणतः ३५ लाख इतकी आहे.तसेच कवठेमहंकाळ तालुक्यात २६५ इतक्या अंगणवाड्या आहेत.आता वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी नव्या पद्धतीने यात वर्गवारी केली गेली असून,त्यात 'खेळ गट', 'छोटा गट' व 'मोठा गट' असे तीन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत.अंगणवाड्यात अशा या वर्गाची रचना करून बालकांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने विकसित केलेला अभ्यासक्रम,राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयार केलेला अभ्यासक्रम राबविण्यास शिक्षण विभागाने आता मान्यता दिली आहे.त्याकरिता अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे.
'वयाशी सुसंगत ठरेल असा अभ्यासक्रम
पूर्वी शालेय शिक्षण फक्त पहिलीपासून गणले जात होते,मात्र नवीन शिक्षण धोरणानुसार आता ३ ते ६ वर्ष वयोगटालाही शिक्षणाचा मूलभूत टप्पा मानण्यात आला आहे.त्यामुळे शिक्षणाची सुरुवात आता बालवाडीतून होत असून अभ्यासक्रम देखील वयाशी सुसंगत पद्धतीने तयार केला गेला आहे.)
'अंगणवाड्यांचेही होणार आता जिओ टॅगिंग'
शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि माहितीचा अचूक वापर सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र रिमोट शेसिंग ऍप्लिकेशन सेंटर (एमआरएसएसी) ने विकसित केलेल्या मोबाईल ऍपच्या मदतीने राज्यातील सर्व शाळांचे आता जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे.या प्रक्रियेत अंगणवाड्यांचेही जिओ टॅगिंग केले जाणार आहे.त्यामुळे प्रत्येक अंगणवाडीचे स्थान,उपलब्ध सुविधा,विद्यार्थी संख्येची अचूक नोंद ठेवली जाणार असून, धोरणात्मक निर्णयासाठी ही माहिती शासनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.)
'यापूर्वी राज्यातील पूर्व प्राथमिक शिक्षण हे अनधिकृत सारखे वाटायचे.मात्र नव्या निर्णयामुळे या शिक्षणालाही आता वेगळी मान्यता मिळाली असून शिक्षणाचा श्रीगणेशा अधिकृत झाल्याचे समाधान होत आहे.
-- सौ रुपाली अनिल शिंदे
(माजी सरपंच घाटनांद्रे)
फोटो - रुपाली अनिल शिंदे सरपंच घाटनांद्रे

