NCT NCT फटाकेमुक्त सण-समारंभ,हाच संकल्प हवा - मा. दिलीप महादार

फटाकेमुक्त सण-समारंभ,हाच संकल्प हवा - मा. दिलीप महादार

नवचैतन्य टाईम्स वाई (प्रतिनिधी):-दिवाळीच्या स्वागतासाठी जय्यत तयारीत असलेल्या सर्वांनाच या आनंदमयी दिवाळी- सणानिमीत्त अगदी मनापासून,माझ्या खूप खूप हार्दिक सदिच्छा आहेतच परंतु, प्रामाणिक ईच्छा असुनही,प्रतिदिन अशा गोड शब्दांच्या शेकडो गोड शुभेच्छांनी,खरंच् आपल्या जीवनात सारं काही गोड गोड होतं असतं का हो?या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने स्वतःलाच विचारून पहावं,माझ्या मते शुभ घडतं ते गोड शुभेच्छांनी नव्हे तर,अपेक्षित कौटुंबिक आणि सामुहिक निर्विघ्न व निर्भेळ आनंद प्रत्यक्ष अनुभवाला येणं हे सर्वस्वी फक्त,आपल्याच आचार-विचार आणि क्रुतीनुसारच् गोड किंवा कडू घडत असतं.                                        उत्सवी ऊत्साहाच्या भरात,ऊडवलेल्या फटाक्यांमुळे मुलाला भाजले,कुठे ना कुठे आग लागली,ऊडालेला फटाका डोळ्यात गेल्याने बाळाचा डोळा झाला निकामी झाला, परवाच वस्तीशेजारील एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस,उडालेल्या फटाक्यामुळे जळून राख झाला, फटाक्यामुळे अशा दुर्घटना नेहमीच होत असतात, शिवाय दिवाळीच्या दिवसात प्रदुषीत हवेची पातळी फारच धोकादायक अवस्थेत पोहोचली,अशा कडू बातम्या दिवाळीच्या आनंदी वातावरणात  वाचल्या-ऐकल्यावर मनांंत विचार आला, मुळात दिवाळीसारख्या आनंदाच्या सणामध्ये, उपद्रवी आणि प्रदुषणकारी फटाक्यांचा संबंधच् काय? थंडीच्या दिवसात येणाऱ्या दिवाळीचा संबंध आहे गोड मिठाई आणि शांतपणे मंद तेवत असलेल्या दिव्यांशी, दिव्याच्या प्रकाशाने अंधार नाहीसा होतो त्याचप्रमाणें आपल्या मनातील, चुकीच्या गोष्टींचा अंधार नाहीसा होऊन अंतर्बाह्य ऊजळलेल्या प्रकाशात सर्वांचीच दिवाळी, मंगलमय, सुखमय, आनंदमय, व्हावी. दिवाळी साजरी करतांना आरोग्य संपन्न अशीच साजरी व्हायला हवी,फटाके फोडून स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याचे दिवाळे काढण्यासाठी होऊ नये. मुळात दिवाळीशी फटाक्यांचा संबंध दुरान्वयानेही असल्याचे तिळमात्रही कारण दिसून येत नाही,तरीही,असे प्रदुषणकारी,वेळ आणि पैशाचा अपव्यय घडवून आणणारे,विध्वंसक फटाके फोडून लहान मुलांना, गरोदर मातांना,दमाविकार असलेल्या वयोवृद्धांना,पशुपक्षांना त्रासदायक ठरणारे,असले कसले हे मानवी आरोग्यासाठी घातक विषारी मनोरंजन? लहान मुलांना पालकांनी फटाक्यांच्या घातक दुष्परीणामाबद्दल समजावून सांगितल्यास, मुले सकारात्मक विचार करून फटाक्यांवर अनावश्यक खर्च होणाऱ्या पैशाचा, इतर चांगल्या कामासाठी नक्कीच उपयोग करतील,                                         आई तू बाबांना सांग,या दिवालीत आपल्या घली फटाके नकोच,त्याऐवजी छान छान पुस्तकं आणून द्यायला शांग ना ग आई बाबांना,असा बोबडा संवाद ज्या घरात घडेल,त्या घरातील मातेच्या चेहऱ्यावरील आनंदाची बरोबरी,फटाकेच् काय,जगातील कुठलीच शक्ती,त्याक्षणी करू शकेल काय?त्याशिवाय मातेच्या अशा अद्वितीय आनंदाचं खरंखुरं वर्णन,कुठलाच महाकवी आपल्या निर्जीव शब्दांनी साकारणंही असंभव.                                                                   सध्या देशात अती पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे अशा वेळी वडीलधाऱ्यामंडळींनी शक्यतो लहान मुलांना समजावल्यास, फटाक्यावरील अनावश्यक खर्च टाळून,तो बळीराजाच्या मदतीसाठी दिल्यास,लहान मुलांच्यामध्येही आतापासूनच जबाबदारीची सकारात्मक जाणीव निर्माण होईल.                        आनंदमय दिवाळीशी, विघ्नकर्त्या फटाक्यांचा तिळमात्रही संबंध नसला तरीही,काही मुठभर फटाके-ऊत्पादक आणि व्यापाऱ्यांसाठी, फटाके हे आर्थिक व्यवहाराचे कारण असले तरी, या देशात करोडो गरीब सर्वसामान्य जनतेसाठी हे व्यवहार्य कारण तर होऊच शकत नाही,आनंदमय दिवाळीचा संबंध,फटाक्यांशी असण्याचे एकमेव कारण म्हणजे केवळ अविवेकी उन्माद हेच होय.याच उन्मादाने आजवर हजारो लोकांची दिवाळी आयुष्य भरासाठी दुःखमय झालेली आहे.असा वाईट प्रसंग,ऐन दिवाळीच्या वेळी दुर्दैवाने कुणावरही येऊ नये.हीच मनोमन भावना. हवा-ध्वनी-पाणी या मानवी जीवनासाठी अत्यावश्यक बाबींचे प्रदूषण थांबवण्यासाठीच् विसर्जित गणेशमूर्ती दान करा, निर्माल्य पाण्यात टाकू नका, होळी लहान करा.पोळी दान करा, वर्षारंभी किंवा वर्षाअंती दारु नको दुध प्या, भोंदू बुवा,  बाबा, माता विरोधी अभियान, जात पंचायती विरोधी आणि जातीअंताचा लढा, जटा निर्मुलन, विद्यार्थी व तरुणामध्ये विज्ञान जाग्रुती आणि त्याचाच एक भागम्हणून फटाकेमुक्त दिवाळी अभियान अशा लोकोपयोगी कार्यक्रमांसाठी आपल्या देशातील पुरोगामी बुद्धीस्ट विचारवंत, वर्षानुवर्षे, जन-प्रबोधन आग्रहाने करत आहेत,त्यांना विरोध करणाऱ्या बहुतांश लोकांना, कालांतराने याच गोष्टी आज बरोबरच वाटत आहेत. परंतु या विरोधात, अजूनही काहीजण ऊगीचच आमच्या धर्मावर हल्ला समजून, हितकारक गोष्टींनांही विरोध करत असतात, क्रुपया हे धर्मावर हल्ला वगैरे असे बिलकुल नसून, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होत असलेल्या अनावश्यक आणि शोषणयुक्त हल्ल्याबाबत जनजागृती असून, त्याला शासन आणि न्यायव्यवस्थेच्या पाठिंब्या बरोबरच समंजस जनतेचाही पाठिंबा अलीकडे द्रुष्य स्वरूपात आणि भरपूर प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे, ही खरोखरच एक आश्वासक अशी बाब आहे.                                                                  दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवघरात श्रीलक्ष्मीच्या फोटोचे पूजन आणि अंगणात तीचेच प्रतिकात्मक चित्र असलेले, सुतळीबॉम्ब किंवा लक्ष्मी बॉम्ब यासारखे, कान बधीर करणारे मोठ्या आवाजाचे फटाके ऊडवून,खऱ्या अर्थाने आपल्या अंगणात, पूजनीय लक्ष्मीच्याच चिंधड्या चिंधड्या ऊडवल्या जात असताना, अशा वेळी प्रत्येक ठिकाणीच जीवघेणे अपघात, किंवा भयंकर आगीसारखे प्रकार होत नसले तरीही, दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे कुठे ना कुठे लहान मोठ्या आगी आणि छोट्यामोठ्या अपघाताच्या बातम्या तुलनेने वाढलेल्या असतात हे कुणालाही नाकारता येणार नाही, लक्ष्मी  पूजनाच्या नांवाखाली किंवा कुठल्याही कारणाने आणि कुठल्याही परिस्थितीत फोडलेले फटाके असो,आर्थिक, मानसिक, पर्यावरणीय नुकसान मात्र सर्व धर्मीयांचे सारखेच होत असते, मोठ्या आवाजाचे फटाके ऊडवण्याच्या गमतीचा आनंद अनुभवण्यापुर्वीच, अंधारलेल्या डोळ्यांना दिसते ती फक्त ऊरलेली राख, ( तेही डोळे शाबूत राहीले असले तर ) गजांत लक्ष्मीने घरात प्रवेश करण्यासाठी, त्या घरात प्रथम शांतता असायला हवी परंतु, लक्ष्मी पुजनादिवशी धडाम् धुड् अशा युद्धसद्रुष्य परीस्थीतीत, खरेच लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करील की, घरातील लक्ष्मी सुद्धा घाबरून पोबारा करील, यावर किंचितही विचार न करता, ऊलट, कानठळ्या बसवणारे फटाके दणादण फोडून, घरात प्रवेश करू पाहणाऱ्या त्या अदृश्य लक्ष्मीला, एखाद्या जंगली श्वापदाप्रमाणे पळवूनच लावत असतो. यात मात्र तिळमात्र शंका नाही.                                 स्वातंत्र्यकाळात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी जनता रस्त्यावर आंदोलनात उतरते,संप-निषेध-मोर्चे यामध्ये भाग घेते,या बाबींना कधीकधी हिंसक वळण लागून संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, वहाने फोडली जातात,आगी लावल्या जातात, अनेक ठिकाणी रस्त्यावर जुने टायर ओळीने पेटवले जातात,अशा पेटलेल्या टायरांच्या काळ्याकुट्ट धूराचे लोट आणि दुर्गंधीने,लांबून सुद्धा गुदमरायला होते, सुर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून ओझोनचे कवच, प्रिथ्वीवरील सजीवांचे रक्षण करते,त्या सुरक्षा कवचालाही, हवा-ध्वनी-पाणी यांच्या वाढत्या प्रदूषणामुळे धोका निर्माण झाला आहे हे फक्त आपण वाचतो, परंतु ‌प्रदूषण वाढवणाऱ्या अनावश्यक बाबींना आपण स्व-प्रयत्नाने सहज टाळू शकत असताना,या अती-महत्वाच्या बाबतीत आपण अजून किती काळ बेफिकीर रहाणार आहोत?की आपल्याच बेफिकिरी-खातर नष्ट होऊन जाणार आहोत?आपण सारेजण आपल्या जन्मभुमीला भुमाता, धरणीमाता असं अत्त्यादरानं म्हणतो कारण,जगातील कुठल्याही भाषेत,माता या सर्वोच्च स्थानाची बरोबरी करणारी पदवी अन्य असूच शकत नाही, आजवर या भु-मातेनं मानवांच्या हजारो लाखो पिढ्यांना वाढवलयं, भरवलयं, अंगाखांद्यावर खेळवलंय, तीच्या अनंत उपकारातून ऊतराई होणं कदापी शक्य नाही,हेच सुर्यप्रकाशाइतकं सत्त्य असतांना,आपण मात्र कुठल्या ना कुठल्या निमित्तानं आपल्या धरणीमातेचं, अनावश्यक कारणांनी, सहज गंमत म्हणून,अंग अंग जाळून,पोळून,भाजून काढत आहोत,बरं या वाढणाऱ्या प्रदुषणांस सर्वात बुद्धिमान असा माणूसच् सर्वस्वी जबाबदार आहे, मानवेतर म्हणजे पशुपक्षी, जलचर, किंवा इतर सजीव जीव-जंतूंचा,या प्रदुषीकरणात बिलकुल सहभाग नाही,ते तर बिचारे निसर्गाचं संरक्षणच् नव्हे तर निसर्गाला सतत संपन्न आणि सम्रुद्ध करत आपलं जीवन व्यतीत करत असतात, "जननी जन्मभुमी ही स्वर्गाहून महान"असं गात असतांनाच, आंम्हीच केलेल्या अगणित जखमांनी घायाळ झालेली भुमाता,आपलं दु:ख लपवून, आजही मातेच्याच ममतेनं आमचा सांभाळ करत आहे परंतु, कर्तव्यतत्पर भुमाता, अलीकडच्या शतकात अनियमित वातावरण, विषारी प्रदूषण, जंगली पशुंच मानववस्तीवर आक्रमण, अतीव्रुष्टी, अवर्षण, नापिकी, नामशेष होत जाणाऱ्या प्रजाती यासारखी कारणे म्हणजे, मानवी अत्याचारामुळे आपली भुमाता अकाली व्रुद्धत्वाकडे झुकल्याचीच लक्षणे तर नाहीत ना?तसं असेल तर मग, जर्जर भु-मातेच्या प्रती आपली भुमिका काय असावी? एक संरक्षक की विध्वंसक,याबद्दल तातडीने विचार करण्याची वेळ आज सर्वांवरच्, विषेशत: सुशिक्षित तरुण पिढीवर नक्कीच येऊन ठेपलेली आहे.                                           प्रदूषणाच्या बाबतीत भारताचा क्रमांक बराच वरचा आहे.अशा वेळी सावधानतेची गरज जास्त असताना,काही जण मात्र आजही या गंभीर विषयाची कुचेष्टाच् करताना दिसतात, लग्न,बारसं, निवडणुकातील विजयोत्सव, मिरवणुका, मोठमोठ्या कारखान्यातून बाहेर पडणारे धूराचे लोट, रासायनिक वायू-गळती,किंवा इतर धर्मीयांकडून होणारी (विशेषतः मुस्लिम धर्मीयांकडून) पशूहत्या व त्यामुळे होणारे प्रदूषण तुम्हाला दिसत नाही काय?तसेच जागतिक पातळीवर सतत कुठे ना कुठे होत असलेल्या विनाशकारी लढाया,इस्त्रायल-यूक्रेनमधील प्रदीर्घ युद्ध, यामुळे होत असलेले प्रदुषण,तुम्हाला दिसत नाही?फक्त हिदूंच्या दिवाळी सणातच तेवढे काही लोकांना,कसे काय प्रदूषण दिसते,असा चुकीचा गैरसमज काही मतलबी लोकांकडून, सुधारकी विचारांच्या विरोधात,नेहमीच मुद्दाम पसरवला जात असतो,प्रदूषण हा विषय कुठल्याही एका धर्माशी निगडित नाहीच,सर्वच धर्मीयांना आरोग्यपुर्ण जीवन जगण्यासाठी, शुद्ध हवा-पाण्याची आवश्यकता असतेच, फटाक्याव्यतिरिक्त, प्रदषणाची अनेक कारणे आहेतच परंतु जागतिक प्रदूषण रोखण्यासाठी इतर देशांचे नेतृत्व, विचारवंत,आणि तेथील जनताही गांभीर्याने प्रयत्नशील आहेत,आपल्याकडे तशी जागरुकता अभावानेच आढळते, आपले प्रशासनही याबाबतीत अलीकडे सजग झालेले दिसत असुन, आपणही वैयक्तिक पातळीवर सहज शक्य प्रयत्न का करू नयेत?प्रदुषीत हवामानामुळे शाळा कॉलेज काही दिवस बंद ठेवावी लागत आहेत, आज प्रदुषणाची घातक पातळी गाठलेल्या आणि मानववस्तीने तुडुंब भरलेल्या, मुंबई- दिल्ली सारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणकारी फटाक्यांवर आणि आवाजाची पातळी ओलांडणाऱ्या डी जे सारख्या घातक यंत्रणेवर कायद्याने बंदी आणलेली आहे, या बंदीला स्थगिती मिळावी म्हणून, फटका ऊत्पादकानी केलेली मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे,आपल्या आसपास आज इतकी भेदक परीस्थिती नसली तरी,भविष्यात तशी परीस्थिती निर्माण झाल्यास,त्याला आपणच जबाबदार असू. याची गांभीर्याने दखल न घेतल्यास,आपल्याच भावी पिढीवर विकतच्या ऑक्सिजनची छोटी छोटी सिलेंडर पाठीवर बांधून फिरण्याची वेळ  येणारच नाही असं खात्रीने म्हणता येईल काय? याचा विचार आत्तापासूनच गांभीर्याने करायला हवा.                                                           शालेय आणि कॉलेजीयन मुलांमुलीनी शैक्षणिक मनोरंजनासाठी, फटाक्यांवर होणारा अफाट अविवेकी व्यर्थ खर्च वाचवून तो पैसा स्वतःच्या शैक्षणिक गरजेच्या साहित्यासाठी व पुस्तकांसाठी खर्च करावा,हा कार्यक्रम फक्त दिवाळीपुरताच राबवायचा नसुन,सुखी जीवन जगण्याचाच एक भाग म्हणून,फटाके-मुक्त दिवाळी म्हणजेच् प्रदुषण मुक्त वातावरण हा उपक्रम राबवून,स्वतःप्रमाणेच आपल्या मित्रांनाही तसे करण्यास ऊद्यूक्त करावे,आपण इथे फटाके आणि पुस्तक यांची तुलना करून पाहूया.

फटाके ध्वनी प्रदुषण,रोग वाढवतात. 

पुस्तके वैचारीक प्रदुषण दूर करतात.

फटाके कष्टाच्या पैशाची राख करतात.

पुस्तके ज्ञान देऊन संपत्ती वाढवतात. 

फटाके मुलांना छोट्या मोठ्या इजा करतात. 

पुस्तके लहान बाळांना छान गोष्टी सांगतात.

 फटाके पशू-पक्षांना घाबरवून सोडतात.

पुस्तके पशू-पक्षी संवर्धन,शिकवतात.

फटाके अहंकार व विध्वंसक वृत्ती रुजवात. 

पुस्तके व्यवहार,दिशादर्शन,प्रेम शिकवतात.

 फटाके प्रकाशातून अंधाराकडेच् ढकलतात. 

पुस्तके अंधारातून जीवन-प्रकाशाकडे नेतात. 

फटाके हीच आहे खरीखुरी विध्वंसक विकृती.

पुस्तके म्हणजे ज्ञान वृद्धी,प्रगत मानव-संस्कृती.

आता फटाके की पुस्तकं यापैकी काय निवडायचं,हे आपापल्या सद्विवेक बुद्धीस स्मरून ठरवल्यास आणि तरुण पिढीने नियोजन- लपुर्वक इच्छीत ध्येयपूर्तीसाठी अभ्यास केल्यास, फटाके न फोडताही आपल्यावर,(काल्पनिक सरस्वती नव्हे) विद्ये बरोबरच खरी धन-लक्ष्मीही प्रसन्न झाल्याशिवाय रहाणार नाही, आणि तसे झाल्यास हीच एक दिवाळी काय, इथुन पुढे आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक दिवाळी, आपलं संपूर्ण आयुष्यच आनंदमय करील,आणि अशा अपेक्षीत आनंद- दायक सुखासाठी,कुणाच्या शाब्दिक शुभेच्छांची आवश्यक ताही उरणार नाही.

फटाक्यांविना सण-समारंभ,

हाच एक संकल्प,मनी हवा.

मनांमध्ये सतत तेवत राहो,

याच द्रुढ संकल्पाचा दिवा.

फटाक्यांविना साजरे होणारे सण,

हेच खऱ्याखुऱ्या आनंदाचे कारण.

पुन्हा एकदा सर्वांनाच,फटाके मुक्त दिवाळीतील अशा आनंदमय, शांततामय, तेजोमय, आणि आरोग्यदायी फटाकेमुक्त  दिवाळीच्या, सर्व-धर्मीय भारतीय बंधू-भगिनींना अंतकरणपुर्वक, खूप गोड गोड हार्दिक सदिच्छा.

                                 🙏🏻  

                       लेखक:- दिलीप महादार

                        ९९६०४९७१३३