NCT NCT पाचट कुट्टी करण्याकडे बळीराजाचा वाढता कल

पाचट कुट्टी करण्याकडे बळीराजाचा वाढता कल

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :-ऊस तोडणीनंतर उसाचे पाचट  पेटवण्याऐवजी शेतामध्येच मशीनच्या सहाय्याने पाचट कुट्टी करण्याकडे कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.                                                          सध्या ऊस तोडणीचा हंगाम जोरात सुरू आहे.तोडणीनंतर यापूर्वी बहुतांश शेतकरी उसाचे पाचट शेतातच पेटवून देत होते, मात्र त्याचे अनेक तोटे होतात हे हळूहळू बळीराजाचा लक्षात आल्यानंतर आता शेतकऱ्यांमध्ये जागृती होत आहे त्यामुळे अलीकडील काळात शेतकरी पाचट पेटवण्याऐवजी ट्रॅक्टरच्या व पाचट कुट्टी यंत्राच्या साह्याने ते सर्व पाचट शेतामध्येच कुट्टी करताना दिसत आहेत.     या संदर्भात बोलताना पाचट कुट्टी यंत्राचे मालक अरविंद माळी (कवठेमहांकाळ) म्हणाले की सात वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत,मात्र सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांना पाचट कुट्टीचे महत्व  समजावून सांगावे लागायचे,मात्र आता अलीकडील काळात शेतकरी स्वतःहून यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. यापूर्वी बहुतांश शेतकरी ऊस तोडल्यानंतर उसाचे वाढलेले पाचट शेतातच पेटवून देत होते. मात्र त्यामुळे जमिनीतील गांडूळ व इतर सूक्ष्मजीवांचीही मोठी हानी होत होती.मात्र पाचटाची कुट्टी केल्यामुळे जमिनीवर सर्वत्र पाचटाचा एकसमान थर पडतो. व त्यामुळे नैसर्गिकरित्या आच्छादनाचे उत्तम काम होते.           बारीक केलेल्या पाचटाच्या या आच्छादनामुळे जमिनीतील ओलावाही बराच काळ टिकून राहतो,त्यामुळे पाण्याची बचत होते व आच्छादनामुळे गवत उगवत नसल्यामुळे तणांचाही बराच काळ उत्तमरीत्या बंदोबस्त होतो.                                         पावसाळा सुरू होताच या पाचटावर सुपर फॉस्फेट व युरिया टाकून दिल्यास हे पाचट चांगल्या प्रकारे कुजून जाते, त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते व त्यामुळे जिवाणूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पिकांची वाढ उत्तमरीत्या होते व जमीन ही चांगली सुपिक बनते.त्याचप्रमाणे उसाची तीन ते चार पिके चांगल्या प्रकारे घेता येतात असे अनेक शेतकऱ्यांचे अनुभव आहेत.