NCT NCT फिरत्या चाकावरती मातीला आकार देणे झाले बंद...विठ्ठला....तु वेडा कुंभार राहीले केवळ अभंगात

फिरत्या चाकावरती मातीला आकार देणे झाले बंद...विठ्ठला....तु वेडा कुंभार राहीले केवळ अभंगात

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे) :-आज पुर्ण कवठेमहांकाळ तालुक्यातील नवी पिढीही कुठल्याही पारंपरिक व्यवसायात  रस घेताना दिसत नाही.त्याला कुंभार व्यावसायीक तर अपवाद कसे राहातील.त्यामुळे आज तालुक्यातील कुंभार व्यावसायीकांना मकरसंक्रांतीसाठी लागणारी सुगाडे ही बाहेरुन आयती आणून विकण्याची वेळ आली आहे.                                                                              नव वर्षातील जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे  'मकर संक्रांतीचा' सण.तो अगदी काही दिवसावरच येऊन ठेपला आहे.पुर्वी यावेळी या सणासाठी लागणारी सुगडे बनवण्याची लगबग संपूर्ण कुभार वाड्यात दिसून येत असे.आज मात्र या सणाला वाण देण्यासाठी महिलांना लागणारे सुगडे बनविण्याची लगबग संपूर्ण तालुक्यात कुठेही दिसून येत नाही ही वस्तुस्थिती आहे.                               लग्न समारंभातील देवक,चवरी असो की,मकर संक्रंतीसाठी लागणारी सुगड की माणसाच्या अखेरच्या प्रवासासाठी लागणारे मडके साहित्य असो,अशा कितीतरी ठिकाणी कुंभाराच्या कला निर्मितीचा उपयोग होत असतो.आज जागतिकीकरणाच्या युगात भारतीय बाजारपेठेत चिनी वस्तूंचा झालेला शिरकाव, त्याचबरोबर परप्रांतातून येणाऱ्या वस्तू या सर्व स्पर्धेला तोंड देताना स्थानिक कुंभाराच्या चाकाचा वेग मात्र पारच मंदावला आहे.                                                    ग्रामीण भागातील बारा बलुतेदारांपैकी एक असलेली कुंभाराची कला.ही कला आज शहरांसह ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नाही.कवठेमहंकाळ तालुक्यात कुठेही कुंभार समाज आपला हा परंपरागत व्यवसाय जोपासताना दिसत नाही. 
मकर संक्रांतीचा सण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा लाडका सण. महिलांसाठी हा सण म्हणजे विशेष पर्वणीच समजला जातो.या दिवशी सुवासिनी एकमेकींना वाण देतात.हे वाण देण्यासाठी ज्या मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो त्याला सुगड म्हणून संबोधले जाते.सध्या धातू आणि प्लॅस्टिकच्या वापराणे मातीची भांडी वापरणे बंद झालेले आहे. मात्र मातीच्या सुगडीचा वापर अद्याप कायम आहे.तो वापर दरवर्षी वाढतच जात असल्याने, संसुकृतिक परंपरा जपण्याकडे लोकांचे मोठे आकर्षण असल्याचे दिसत आहे.                                                      कवठेमहांकाळ तालुक्यात कोठेही कुंभारवाड्यात ही सुगडी आणि बोळकी बनवताना दिसली जात नाहीत.अन्यता पुर्वी मोठ्या प्रमाणात तालुक्यात संक्रांतीनिमित्त या कामांना यावेळी वेग येत असे.शेतातून आणलेली माती चाळूण पाण्यात भिजवली जात असे.त्यानंतर ती पायाने तुडवली जात असे.या बनलेल्या मातीचा गोळा गोल फिरणाऱ्या चाकावर ठेऊन त्याला आकार दिला जात असे.पण हे चित्र सध्या कुठेही दिसून येत नाही.

पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड पण ती पण झाली बंदच

पूर्वी कुंभार मातीची भांडी बनविण्यासाठी हाताने फिरणाऱ्या चाकाचा उपयोग करत असत.तदनंतर मात्र काही कुंभार बांधवांद्वारे या चाकाला विद्युत मोटार लावली जायची व मोटारी द्वारे फिरणाऱ्या चाकावर हवी तशी मातीची भांडी तयार करत पण आता हेही बंद झाले आहे.

आधुनिकतेच्या काळात वाढती प्रगती पाहता कुंभार समाज आजही गरिबीच्या परिस्थितीच आहे.तयार आणलेल्या मातीच्या वस्तू विकून आपला हा व्यवसाय कसाबसा करत आहेत. प्रगतीच्या वाटेवर जात असताना मातीपासून तयार झालेल्या वस्तूच्या किंमती मात्र जशाच्या तशाच आहेत. 
                   गणेश कुंभार

                 (कुंभार व्यावसायीक घाटनांद्रे.)