NCT NCT विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

विश्वबंधुत्वाचा भाव प्रदर्शीत करणारा महाराष्ट्राचा 59वा निरंकारी संत समागम भव्य रुपात संपन्न

 सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज कौस्तुभ पुरस्काराने सन्मानित

शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्रत्येक युगाची आवश्यकता

 — निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज 

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-सांगली, 27 जानेवारी 2026 : महाराष्ट्राचा तीन दिवसीय 59वा वार्षिक निरंकारी संत समागम 26 जानेवारी रोजी सांगलीमध्ये भव्य रुपात यशस्वीरित्या संपन्न झाला. समागमाच्या समापन सत्रामध्ये सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी लक्षावधी भाविक भक्तगणांना संबोधित करताना सांगितले, की शाश्वत निराकार परमात्म्याचा बोध प्राप्त करुन जीवनात प्रेम, दया आणि करूणेचा भाव अंगीकारणे ही प्रत्येक युगाची आवश्यकता राहिली आहे. 
सदगुरु माताजी म्हणाल्या, की मानवाचा दृष्टिकोण बहुधा नकारात्मक होऊन जातो. त्यामुळे तो चांगुलपणामध्येही दोष शोधत राहतो. याउलट संतजन परमात्म्याच्या जाणीवेमध्ये जगून अंधारातही प्रकाश किरणाला आधार बनवतात. ब्रह्मज्ञानाद्वारे ते स्वत:चे जीवन उज्ज्वल करतातच, शिवाय समाजालाही प्रकाशमान करतात.                                                   संतांच्या जीवनाचे वैशिष्ट्ये समजावताना माताजी म्हणाल्या, की संतांचे जीवन दिखावा, कट-कारस्थानापासून मुक्त आणि सहज, सरळ व सकळांच्या कल्याणासाठी समर्पित असते. सतगुरु माताजींनी निरंकारी भक्तांना सत्संग, सेवा व सिमरणाच्या माध्यमातून आत्ममंथन करत सजग व सकारात्मक जीवन जगण्याचे आवाहन केले. 

समागमाची क्षणचित्रे

कविदरबार समागमाच्या तिन्ही दिवशी “आत्ममंथन” या विषयावर कवि दरबाराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये देश-विदेशातील एकंदर 22 कवी व कवियित्रींनी मराठी, हिंदी, पंजाबी, हरियाणवी, भोजपुरी व इंग्रजी भाषांच्या माध्यमातून काव्य पाठ प्रस्तुत केला ज्याचा भरपूर आनंद श्रद्धाळु भक्तांनी प्राप्त केला. 

“कौस्तुभ पुरस्कार” देऊन सन्मानित 

समागमाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र स्टेट जर्नलिस्ट्स एसोसिएशन यांच्या वतीने वर्ष 2026 चा प्रतिष्ठित “कौस्तुभ पुरस्कार” सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण तथा संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री माननीय श्री.चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान केला गेला. या प्रसंगी असोसिएशनचे संस्थापक श्री.संजयजी भोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.    सेवादल व श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सतगुरू माता सुदीक्षाजी महाराजांनी प्रतिपादन केले, की जीवनात निराकार परमात्म्याला प्राथमिकता देत समर्पित भावनेने सेवा करायची आहे. सेवा केवळ एक कार्य नसून ते पूर्ण मनोभावे श्रद्धा व सत्कार भावनेने करायची भावना आहे. सेवेच्या सोबत जीवनात सत्संगला महत्व देणे सुद्धा सेवेचेच एक रूप आहे. सेवेच्या मूळ भावनेला समजून केले गेलेले कार्यच जीवनामध्ये सुधार करते.                                       “बाल-प्रदर्शनी” उभारली असून त्यामध्ये बालकांना उज्ज्वल जीवन जगण्याची प्रेरणा देणारे शिक्षाप्रद आकर्षक मॉडेल्स बनवले आहेत ज्याचा उल्लेख निरंकारी राजपिताजी यांनी आपल्या विचारांमध्येही केला. प्रदर्शनीच्या तिसऱ्या भागात मिशनची समाजकल्याण शाखा ‘संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन’च्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनीचा समावेश आहे. 

लंगर व कॅंटीन व्यवस्था

समागमात येणाऱ्या सर्व श्रद्धाळूंसाठी दिवस-रात्र सामूहिक भोजनाची (लंगर) व्यवस्था मैदानाच्या तिन्ही भागांमध्ये केली आहे. एका लंगर स्थानावर एकाच वेळी जवळपास 10,000 श्रद्धाळू भोजन करू शकतात. या व्यतिरिक्त 4 कॅंटीनची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामध्ये अत्यल्प दरात चहा, कॉफी, शीत पेय व अल्प-उपहार उपलब्ध आहेत. मिनरल वॉटरची देखील उचित व्यवस्था याच कॅंन्टीनमध्ये करण्यात आली आहे.

स्वास्थ्य सेवा

समागम स्थळावर तीन डिस्पेंसरी, दोन प्राथमिक चिकित्सा केंद्र तसेच आईसीयू सुविधेसहित हॉस्पिटलची व्यवस्था केलेली होती. ॲलोपॅथी, आयुर्वेद व होमिओपॅथी पद्धतिने जवळ जवळ 50,000 भाविकांना स्वास्थ सेवा प्रदान केल्या गेल्या. या व्यवस्थेमध्ये 54 डॉक्टर्स व 326 चिकित्सा कर्मचारी कार्यरत होते. आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी 11 ॲम्ब्युलन्स तैनात होत्या. 

कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिर 

प्रशंसनीय आहे, की कायरोप्रॅक्टिक चिकित्सा शिबिरामध्ये विदेशातून 23 तर भारतातून 2 विशेषज्ञांनी आपल्या निष्काम सेवा प्रदान केल्या. तीन दिवसांमध्ये जवळपास 3,000 भाविकांनी या चिकित्सेचा लाभ घेतला.