NCT NCT मराठीचे भवितव्य आणि आपली जबाबदारी

मराठीचे भवितव्य आणि आपली जबाबदारी

भाषेला संस्कृत,प्राकृत,अपभ्रंष व मराठी अशी पूर्वपीठिका आहे.तशी ती अन्य भाषांना ही असते.भाषेचा उगम, विकास कधी केव्हा झाला या संदर्भात भाषा तज्ञांची मांडलेले मतमतांतरे व सिध्दांत असतात. सत्य काय आहे ,हे सांगण्यासाठी त्यांनी लिहिलेली भाषा शास्त्रीय पुस्तके व त्यातील संदर्भ पुन्हा नव्याने जाणून घेणारा जिज्ञासू वाचक वर्ग निर्माण होत नाही,तो पर्यंत मराठीचे भवितव्या बाबत शंका उत्पन्न होऊ शकते. चिकीत्सक वाचकवर्ग प्रथम  महाराष्ट्रात निर्माण झाला पाहिजे. तो वाचक वर्ग निर्माण करण्याचे खरे सामर्थ्य साहित्यिकांच्या साहित्य निर्मितीत आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा फार मोठ्या प्रमाणात लिहीली व बोलली जाते. तिच्यातील साहित्य निर्मितीची उगम स्थळे महाराष्ट्राच्या अंगाखांद्यावरील वाढलेल्या मातृभाषेत आहेत.मराठी भाषेला संरचना लाभलेली आहे. व्याकरण हे भाषेचे मूळ शास्त्र आहे. मराठीचा तो प्रगल्भ आत्मा आहे. व्याकरणकारांनी निर्माण केलेले नियम व संशोधन परिपूर्ण असले ,तरी बऱ्याच जागा नवीन संशोधकास खुणावत असतात. त्या जागा अचूक समजल्या  पाहिजेत.काठींण्य पातळीवरील काही घटक शालेय मुलांना नव्याने समजून सांगिण्याच्या अनेक ठोकताळे किंवा क्लुप्त्या शोधून काढता आल्या पाहिजेत. घटकांवर अत्यंत सोप्या, सुलभ, पद्धतीचे समजावून सांगणारे व्याकरणकार काळाच्या ओघात निर्माण होत नाहीत ,तो पर्यंत मराठीचे भवितव्य संदिग्ध असणार आहे.पूर्वीचे संशोधक, लेखक, कवी, कथा कार, कादंबरीकार नाटककार, गझल कार, चरित्रकार, आत्मचरित्रकार, प्रवास वर्णनकार, लोकसाहित्यक, बखरकार लावणीकार,अभंगनिर्माते चित्रपट निर्माते, संवाद, पटकथाकार मुलाखतकार, ललित निबंधकार, अनुवादीत, प्रतिभावंतकार साक्षात्कारी संत महंतांनी महिलांनी मराठी भाषेचे साहित्यातून भवितव्य घडवलेले आहे.तो भवितव्याचा आरंभ काळ समजून नवीन काम अभ्यासकांनी शोधले पाहिजे.मराठीचे भवितव्य उज्ज्वल करावयाचे असल्यास मागच्या पाच ते सहा दशकातील निर्माण झालेल्या ज्ञात अज्ञात साहित्य व लेखकांच्या पुस्तकांचा मागोवा, तत्कालीन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले साहित्य प्रकार एकत्रित गोळा केले पाहिजेत. तेव्हा मराठी भाषेचे भवितव्य उज्ज्वल होईल.आज कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यापीठातील शिवाजी काॅलेजचे उपप्राचार्य प्रा.डाॅ.वाघमारे यांचे मराठी भाषेतील नवनिर्माण होणाऱ्या सर्व साहित्य प्रकारांची नोंद करता यावी. या साठी सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांना मराठी भाषादिनाचे औचित्य साधून सन्मानीत करुन साहित्य गोळा करुन त्यांची नोंद केली आहे.हा त्यांचा उपक्रम कर्मवीर भाऊराव विद्यापीठातील पहिलाच दिव्य प्रयत्न आहे.त्यामुळे मराठी भाषेचे भवितव्य जागृत होत आहे. भाषेतील स्वर वर्णमाला, व्यंजने, शब्दसिध्दी ,शब्द निर्मिती निर्मिती, उच्चार व अर्थप्रक्रिया,भाषेचे उन्नयन,व वापर यांचा मानवी जीवनाशी सांगड घालणे ही चांगल्या अभिजात कवी, लेखक, साहित्यिक, वक्ता, श्रोता, वाचकांची, तशीच ही प्रत्येक नागरिकाची खरी जबाबदारी आहे. याची जाणीव समाजाला करुन दिली पाहिजे. भाषेला शास्त्रशुद्ध व्याकरणाचा देह लाभलेला आहे.या देहरूपात अनेक घटकांच्या रक्तवाहिन्या आहेत. त्यांचा नव्याने अभ्यास करणाऱ्या भाषिकांची सध्या खूप गरज आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते,पण त्या तासापुरती.इतर वेळी मराठी बोलले तर आर्थिक दंड केला जातो. हे मी जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रापुरती बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेची जागतिक पातळीवर पिछेहाट होत आहे. तिचा विकास राज्या बाहेर कसा करता येईल यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न करायला हवे आहेत,बाहेरच्या राज्यातील भाषा आपल्या अभ्यासक्रमात आणावी व आपली भाषा त्यांच्या अभ्यासक्रमात असावी त्यामुळे  भाषांची आदान प्रदान घडून येईल.इंग्रजांची भाषा आपल्या देशातील लोकांना मान्य आहे तर इंग्लंडमध्ये आपली मराठी भाषा अभ्यासक्रमात का नाही.? यांचा कोणीही विचार करत नाही. शिक्षण मंत्री असणाऱ्याअनेक व्यक्तींनी तसा प्रयत्न केलेला नाही? जागतिक पातळीवर भाषा सुखरूप नांदायची  शिक्षणमंत्री यांनी भाषेच्या दर्जा विषयी जागृत का असू नये? राजाआश्रयाने मराठीचा विकास साधता येईल.पण कोणीही लक्षात घेत नाही?हिंदी भाषा सर्व देशातील लोक बोलतात. मग मराठी तेथे प्रसिद्ध का पावत नाही. याही गोष्टींचा उहापोह करताना कोणीही दिसत नाही.भाषा विकास कार्य करण्यासाठी मराठी प्रेमिकांची नव्याने पुनर्रचना होणे आवश्यक आहे. विद्यापीठ पातळीवर निवृत्त डॉक्टर. प्राध्यापक यांची संघटना पाहिजे, दुसऱ्या बाजूला साहित्यिक कवी लेखकांची संघटना प्रस्थापित करुन राजमान्यते साठी  जागतिक अवस्थेपर्यंत परिसं वाद भरवले पाहिजेत. साहित्यिक मनाने श्रीमंत व भावनिक असतात तेच मराठी भाषेचा उध्दार करु शकतात.शालेय जीवनातील विद्यार्थ्यांवर भाषिक कौशल्यांचे संस्करण करणे ही खरी आपली जबाबदारी आहे.त्यातील प्रत्येक मुद्यांचे व तत्वांचे पुन्हा नव्याने आदर्श पुनर्मांडणी परिणामकारक केली तर काही अंशी जबाबदाऱ्या सार्थकी लागतील असे माझे खास मत आहे.                                                              वाचन:-

चांगल्या पुस्तकांचे वाचन करणे ही एक वैचारिक व बौध्दिक क्रांती आहे. वाचनाने मनाचे रोग बरे होतात. ज्ञानाची वलये विस्तृत होऊन सभा गाजवता येतात. अनेक लेखकांच्या भूमिका व त्याच्या विचारांचे आकलन होते. वाचनाने कोणताही वाचक चतुरस्त्र श्रोता व वक्ता बनतो. वाचाल तर वाचाल हे विधान सत्य आहे. वाचनाची सवय व पुस्तकातील विचारांचा वेधघेण्यासाठी शिक्षकांनी मुलांना विचार प्रणव केले पाहिजे. त्यासाठी शिक्षकांच्या पाठो पाठ पालकांची महत्त्वाची जबाबदारी असते. ती म्हणजेआपल्या घरात स्वतंत्र वाचनालय निर्माण करावे. या वाचनालयात संत चरित्र असली पाहिजेत.दुर्दैवाने शालेय ग्रंथालय व पुस्तकांचे संच मृत पावलेले असून मनापासून मुले पालक व शिक्षक वाचन करीत नाहीत.हे माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. 

लेखन :

लेखन हे एक मराठी भाषेचे अभिजात अंग आहे,आपल्या मनातील विचार व्यक्त करण्यासाठी अचूक व योग्य शब्दांचा वापर कसा करावा. याचा अनुभव मुलांना दिला पाहिजे. मुलांच्या मनात लेखन कलाकृतीचे नवनवीन प्रयोग केले पाहिजेत.निबंध,गृहपाठ, निसर्गातील सहली,निसर्ग निरीक्षण, सांस्कृतिक कार्यक्रमाची एखाद्या उत्सावाची माहिती लिहावयास प्रवृत्त करावे.तरच लेखन कलेचा विकास होईल.अनेक मुद्दे देऊन ज्ञानरचनावाद निर्माण करावा. कवितेतील सात ते आठ शब्द देऊन नवकवितेचे जाणीव पूर्वक मनापासून धडे देता येतील. अक्षरे सुंदर मोत्या सारखी काढता आली पाहिजेत.काही मुले अक्षरे काढतात पण  अक्षरांना रेघा मारत नाहीत.रेघा मारल्याशिवाय अक्षरे पूर्ण होत नाहीत असे आपण जबाबदारीने सांगितले पाहिजे. अक्षरे तोडून शब्द लिहावयाचे अनुभव दिला पाहिजे. नाहीतर एका ओळीत तलाठी जसा लिहतो. तसे होता कामा नये म्हणून अधिक्याने लक्ष देणे आवश्यक आहे. 

स्मरण:- 

विस्मृती ही तात्काळ घडून येणारी प्रक्रिया आहे. चांगल्या घटना लवकर विसरल्या जातात. वाईट घटना मात्र कायम मनावर ताज्या राहतात. असे का घडते समजत नाही, मुलांमध्ये भाषिक कौशल्य वाढवण्या साठी त्यांच्यातील स्मरण शक्तीचा अभ्युदय घडविणे महत्त्वाचे आहे. एकाग्र चित्ताने वाचन केल्यास मुलांचे पाठांतर, स्मरण आपोआप वाढीस लागते.लक्षात ठेवण्यासाठी कवितांना चाली लावल्या पाहिजेत.ध्यान एकाग्र वाचलेले लक्षात कसे करावे यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी पातंजल योगसंहिता, वशिष्ठ संहिता, घेरंड संहिता, मनाचे श्लोक या साहित्यांची ओळख मुलांना करुन देणे आवश्यक आहे

शब्दांचे उच्चार: 

प्रक्रीयेमध्ये वेळीच काळजीपूर्वक सुधारणा घडवून आणली पाहिजे. शिक्षकांनी सुस्पष्ट, यथार्थ, दीर्घ, ह्रस्व, काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, विसर्ग लक्षात घेऊन शिस्तीने उच्चार करावेत.किंवा फलकावर सुवाच्छ अक्षरात शब्द लिहावेत. मुलांकडून मोठ्या आवाजात वाचन करुन घ्यावे. बोलताना स्वर लोप होतात किंवा स्वरांची आदला बदल होते. ती न होता शांततेने मनात शब्द घोळवता आले पाहिजेत.जोडाक्षरे,रफारांची अक्षरे, एक मात्रा व दोन मात्रेतील उच्चार एकच करतात.अक्षरावरील अनुस्वाराचा वापर अचूक पणे झाला पाहिजे.सधारण्याची आपल्या सर्वांची महत्वाची जबाबदारीआहे,

श्रवण: दैनंदिन जीवनात मराठी भाषेतील शब्द लिहताना काळजी पूर्वक नीट न ऐकून घेतल्याने गंभीर समस्या निर्माण होतात, चुकीच्या बाबतीत विद्यार्थी, पालक शिक्षकांनी स्पष्ट, सुंदर, ठळक , उच्च आवाजात उच्चारावेत म्हणजे चुकीचे होणार नाही. श्रवण ही शक्ती आहे. त्यामुळे दूरदूर असणाऱ्या लोकांचा संवाद मन एकाग्र केल्यामुळे समजतो.घाईघाईने उच्चारलेले वाक्य विद्यार्थी चुकीचे लिहू शकतो. एखाद्या मुलाचा श्रवण दोष असेल तर पालकांना सांगून डॉक्टर कडून दोष निवारण करता येईल.

भाषण, संभाषण:-

उपजत काही मुले मनसोक्त बडबडत असतात. हा स्वभाव काही तरी नवीन रुपात व्यक्त होण्यासाठी धडपडत असतो. अशा मुलांना भाषण, किंवा संभाषण कसे करावे हे समजून दिले तर ती वक्ते होतील. संवाद व अभिनय केलेला सांस्कृतिक कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, गझल, प्रवासवर्णन,पत्र,निबंध लेखन व्याकरण हे साहित्यिक प्रकार सांगून त्यांची विशेष गती कोठे आहे.ते ओळखून दिशा दाखवण्याची जबाबदारीआपली आहे. हे पुन्हा लक्षात घ्यावे लागेल. कार्यक्रमातील संवादा बरोबर अभिनय,नाट्य, गायन, संगित, खेळ आदी भाषीक कौशल्ये वाढवता आली पाहिजेत.सारांश  वरील सर्व मुद्यांची पुनर्मांडणी व कार्यवाही नव्याने शिक्षणात घडवून आणून भाषेचा दर्जा उत्तम स्थितीत ठेवणे हीच खरी प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.

प्रा.श्री. संभाजी लावंड

उत्कर्षनगर , सिध्दनाथवाडी वाई.