NCT NCT महाविद्यालयीन जीवनातील संस्कार व अभ्यास हीच यशाची पायाभरणी-पोलीस उपअधीक्षक सौ.पुष्पलता चव्हाण

महाविद्यालयीन जीवनातील संस्कार व अभ्यास हीच यशाची पायाभरणी-पोलीस उपअधीक्षक सौ.पुष्पलता चव्हाण

 नवचैतन्य टाईम्स जत दि.22 (प्रा. कुमार इंगळे ):- ध्येय गाठण्यासाठी नशिबावर नाही तर मनगटावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. महाविद्यालयीन जीवनात समोर ध्येय ठेवून प्रामाणिक प्रयत्न करुन गुरुदेवांनी केलेले संस्कार आत्मसात केल्यास यश निश्चित मिळते. कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याची ताकद राजे रामराव महाविद्यालयाने माझ्यामध्ये निर्माण केली. त्यामुळेच मी राष्ट्रपती पदकापर्यंत पोहोचू शकले. म्हणून विद्यार्थी मित्रांनो महाविद्यालयीन जीवनात झालेले संस्कार व आपण केलेले प्रामाणिक प्रयत्न हीच यशस्वी जीवनाची पायाभरणी असते असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी, राष्ट्रपती पोलीस पदक सन्मानित, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र पोलीस उपाअधीक्षक सौ.पुष्पलता दिघे चव्हाण यांनी केले.                              त्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व त्यांना नुकताच पोलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलीस पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार समारंभाच्या प्रसंगी  प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व विद्या समीतीचे अध्यक्ष श्रीराम साळुंखे हे होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा.कृष्णा रानगर, विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजीवसेवक माजी मुख्याध्यापक कृष्णा बिसले, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोबी, प्रा.सिद्राम चव्हाण, प्रा.श्रीमंत ठोंबरे, सौ.मिनाक्षीताई अक्की व उपप्राचार्य प्रा.महादेव करेनव्वर उपस्थित होते.                                                यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अजिवसेवक व विद्या समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीराम साळुंखे म्हणाले की, निव्वळ सुंदर इमारतीमुळे महाविद्यालयाचे सौंदर्य वाढत नाही तर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे महाविद्यालयाचे सौंदर्य वाढते. आज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला राष्ट्रपती पोलीस पथकाने सन्मानित करण्यात आले आहे हेच महाविद्यालयाचे खरे सौंदर्य आहे  असे सांगून त्यानी ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक परिश्रम करा. व्यसनाधीनतेमुळे घरे उद्ध्वस्त होतात त्यामुळे त्यापासून दूर राहा. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.       प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा.कृष्णा रानगर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकातून महाविद्यालयाने वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. प्रथम सत्रामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लिखित व मुद्रित शेला-पागोटा यांचे वाचन व सादरीकरण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा.कृष्णा रानगर यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अहवालाचे वाचन करून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये केलेल्या विविध कामांचा व विविध विभागाने राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे यांनी क्रीडा अहवालाचे वाचन करुन वर्षभरात क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला.                                             यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विद्यावाचस्पती हि पदवी प्राप्त केलेल्या व पेटंट मिळविलेल्या गुणवंत प्राध्यापकांचा सन्मान शाल व ट्रापी देऊन करण्यात आला. तसेच शिवाजी विद्यापीठामध्ये पहिल्या दहामध्ये नंबर आलेल्या रँकर विद्यार्थ्यांचा व शिवाजी विद्यापीठाची गुणवत्ता शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या  विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचे वाचन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांनी केले. तसेच वरिष्ठ विभागामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय, आंतर विभागीय स्तरावर, विभागीय स्तरावर, विद्यापीठ स्तरावर व जिल्हा स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रथम, व्दितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळविलेल्या त्याचबरोबर कनिष्ठ विभागातील यशस्वी व गुणवंत खेळाडू या सर्वांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतिशकुमार पडोळकर यांनी तर आभार कनिष्ठ विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.रवींद्र काळे यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.