NCT NCT कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाची दमदार कामगिरी; डॉ. प्रवीण पुजारी यांचा खासदारांच्या शुभहस्ते गौरव

कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयाची दमदार कामगिरी; डॉ. प्रवीण पुजारी यांचा खासदारांच्या शुभहस्ते गौरव

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उल्लेखनीय परिणामकारक आरोग्यसेवा देत जिल्ह्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या धडाकेबाज कामगिरीबद्दल रुग्णालयाचे डॉक्टर प्रवीण पुजारी यांचा जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.                                                       ग्रामीण रुग्णांना तातडीची आणि दर्जेदार सेवा देत अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांवर यशस्वी उपचार करण्यात डॉ. पुजारी यांनी पुढाकार घेतला. आपत्कालीन परिस्थितीत तत्पर निर्णयक्षमता, रुग्णांप्रती संवेदनशीलता आणि कामातील शिस्त यामुळे रुग्णालयाची विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे.                                                                   या यशामागे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय भोसेकर यांचे कणखर व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयाने केवळ सेवा दिली नाही, तर ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवा आत्मविश्वास दिला आहे.      खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ग्रामीण भागात अशी झोकून देऊन काम करणारी वैद्यकीय टीम हीच खरी आरोग्य व्यवस्थेची ताकद आहे.”यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात डॉ. पुजारी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.