नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा. संभाजी लावंड):-दीन दलित, वंचित, अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक मिळावी व इतर जाती प्रमाणेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा या हेतूने प्रेरित होऊन आयुष्यभर संघर्ष केला व समाजाला समतेची दिशा दिली. अशा समतेचा विचार देणारे महान व्यक्ती म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ' शिका संघटित व्हा व संघर्ष करा ' हा महामंत्र दीनदलीत समाजाला देऊन त्यांच्या मनामध्ये स्वाभिमानाचे बीज पेरले .यामुळे हा समाज विषमतेच्या काटेरी झुडपांना तोडून समतेच्या वनराईत सुखाने नांदू लागला. याचे सर्व श्रेय ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये ,ग्रंथांचे वाचन ,चिंतन मनन अभ्यास यास आपले सोबती करून यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःबरोबरच समाजाला देखील करून दिला .त्यांच्या ग्रंथ प्रेमामुळेच ते ज्ञानसूर्य झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांचा छोटेखाणी सत्कार होता. या सत्कार समारंभमध्ये थोर विचारवंत गुरुवर्य केळुस्कर गुरुजी यांनी स्वलीखित गौतम बुद्धांचे चरित्र भेट म्हणून त्यांना दिले . हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हाती लागलेले पहिले पुस्तक होय. या पुस्तकामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनामध्ये प्रभावित झाले. अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडणाऱ्या समाजाला ज्ञानप्रकाशाने शिक्षणाचा मार्ग दाखवून समाज उन्नती करीता दिशा दिली. बाबासाहेबांनी जीवनभर वाचनाला महत्त्व दिले. लहानपणापासून त्यांनी ग्रंथ व ग्रंथांशी मैत्रीचे नाते जोडले .त्यांचे वडील हलाक्याच्या परिस्थितीतही पुस्तके घेऊन देत.वेळप्रसंगी पुस्तके खरेदी करिता कर्जही घेत होते. एकदा तर वडील रामजी यांनी आपल्या मुलीचे दागिने गहान ठेवून बाबासाहेबांसाठी पुस्तके खरेदी केली होती.जीवनभर अखंडपणे वाचनाचा ध्यास घेतलेल्या बाबासाहेबांनी शिक्षणाला महत्त्व दिले. या शिक्षणातूनच सारा दीन दलित समाज त्यांनी ज्ञानवृक्षाच्या सावलीत बसविला. जीवनात ज्ञानाच्या लालसे पोटी त्यांनी कोणतीही समस्या अडचणी याची तमा न बाळगता संयम ठेवून धैर्याने संकटाला तोंड दिले, ते केवळ ग्रंथ वाचनामुळेच .आपल्या प्रकृतीची पर्वा न करता ते अखंडपणे वाचनातच मग्न होत असे. बाबासाहेब हे स्वतः ' दि बुद्ध अँड हिज धम्म 'हा ग्रंथ लिहित होते. बाबासाहेबांचे सचिव नानकचंद रतू होते . एके दिवशी डॉ. बाबासाहेब या ग्रंथाचे लेखन करत होते. रात्रीचे नऊ वाजले होते. त्यांनी नानकचंद यांना सांगितले "रात्र झाली आहे, आता तुम्ही घरी जा. नानकचंद घरी गेले सकाळी नानकचंद हे नेहमीप्रमाणे नऊ वाजता आले. यावेळी देखील बाबासाहेब लिहीतच होते . नानकचंदांना वाटले, बाबासाहेब हे सकाळी तयार होऊन पुन्हा लिखाण करीत आहे. त्यांना काही हवे आहे का हे विचारण्यास गेले, तर बाबासाहेब म्हणाले," अरे तुम्ही अजून घरी गेला नाहीस का?" यावर नानकचंद म्हणाले, "साहेब मी काल रात्री नऊ वाजता घरी गेलो होतो ",आता सकाळी नऊ वाजता पुन्हा आलो आहे .गेली बारा तास तुम्ही एका जागेवर बसून लिखाण काम करीत आहात."यामुळे नानकचंद भावनाविवश झाले, त्यांना अश्रू आवरता आले नाही. यामुळेच अज्ञानाने झोपलेल्या समाजाला जागा करणारा महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय असे म्हणतात. बाबासाहेबांनी वाचन आणि लेखन याचा ध्यास घेतला होता. वाचनाच्या ध्येयपोटी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते.आर्थिक चणचण व वेळ हे त्यांना सतत भेडसावत होती.डॉ. आंबेडकर परदेशामध्ये शिकत असताना पैसे आणि वेळ याची सांगड घालण्याची त्यांना कसरत करावी लागत होती.ते म्हणतात "परदेशामध्ये शिकत असताना मला जेवणा करीता पैसे आणि झोपण्याकरता वेळ मिळत नसे. परंतु पुस्तके विकत घेणे आणि ती वाचणे याकरिता पैसे आणि वेळ मिळत असे. बाबासाहेब जेव्हा कोलंबिया विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत होते. तेव्हा तेथील ग्रंथालयात ते अठरा ते वीस तास वाचन करीत असे. एकदा बाबासाहेब त्या ग्रंथालयात वाचन करत असताना भूक लागली म्हणून त्यांनी आपल्या जवळील खाद्यपदार्थ ग्रंथपालाची नजर चुकवून खात होते त्यावेळी ग्रंथपालानी त्यांना पाहिले, ग्रंथपाल रागावले. ग्रंथालयात खाण्यास मनाई आहे,असे सांगितले. परंतु बाबासाहेबांनी त्यांची पैसे वेळ व वाचन यांची होणारी त्रेदात्रिपट या विषयी सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर ग्रंथपाल यांना वाईट वाटले.त्यांनी स्वतः बाबासाहेबांच्या दररोजच्या जेवणाची व्यवस्था केली.ग्रंथावर असणाऱ्या प्रेमापोटी बाबासाहेब देशापरदेशा मध्ये गेल्यानंतर त्या शहरातील प्रसिद्ध अशा पुस्तकांच्या दुकानाला भेटी देत होते. आपल्याला आवडणारी, अभ्यासाला पूरक असणारी असे ग्रंथ खरेदी ते करत. आपल्या कार्यक्रमाच्या वेळेतूनही ते वेळ काढून पुण्यामधील वेगवेगळ्या पुस्तकांच्या दुकानी जात. पुणे येथील डेक्कन जिमखाना वरील इंटरनॅशनल बुक डेपो या दुकानी जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वतः पुस्तके खरेदी करत .या दुकानचे मालक दीक्षित हे बाबासाहेबांना आवडतील अशी छोटी मोठी पुस्तके अगोदरच बाजूला काढून ठेवत. बाबासाहेब आल्यानंतर ती पुस्तके देत असत या ग्रंथाच्या प्रेमातूनच दीक्षित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ नाते जुळून आले होते. अशा ग्रंथाप्रेमातूनच बाबासाहेबांनी अनेक माणसे आपल्या जीवनामध्ये मिळवलेली होती. एकदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना आवडलेल्या व वाचनीय पुस्तकांची यादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठवली व खरेदी करा असा निरोप दिला ,तेव्हा बाबासाहेबांनी हे सर्व ग्रंथ आपल्या ग्रंथालयात अगोदरच खरेदी करून ठेवली आहेत असा नम्रपणे पंडित नेहरूंना निरोप पाठविला.इतका प्रचंड ग्रंथ साठा बाबासाहेबांच्या संग्रही होता. बाबासाहेबांनी जेव्हा मुंबई येथे आपले स्वतःचे दोन मजली राजगृह नावाचे घर बांधले . यामध्ये एक मजला फक्त ग्रंथासाठीच होता. या ग्रंथांच्या प्रेमाने व अफाट वाचनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सतत वाचनाचे चिंतन,मनन करून देशांमध्ये आणि परदेशामध्ये विश्वविद्यालयातून एम. ए .एम . एस्सी.डी.एस्सी आणि बार ऍट. लॉ. या स्वरूपाच्या एकूण ३२ हून अधिक अशा पदव्या संपादित केल्या. त्याचबरोबर राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र, मानव वंशशास्त्र ,तर्कशास्त्र ,तत्त्वज्ञान, इतिहास व कायदा या विषयातील ज्ञान मिळवून जगामध्ये एक नामवंत,जिज्ञासू, अभ्यासू लेखक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता.या वाचनातूनच मिळविलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी ५८ पेक्षा अधिक पुस्तकांचे विपुल असे लेखन करून जागतिक दर्जाचे एक उत्कृष्ट लेखक म्हणून नावलौकिक मिळवलेला होता.याच लिखाणाच्या आधारे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहून' भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' अशी त्यांची ओळख झाली. आपल्या दीन, दलित ,वंचित अशा समाज बांधवांसाठी त्यांनी आयुष्यभर वाचन लेखन करून शिक्षणाची गंगोत्री समाजापुढे आणली होती.त्याचबरोबर स्वातंत्र्य,समता, आणि बंधुता या तत्त्वांचा जीवनात अंगीकार करून समतेचे विचार चक्र त्यांनी फिरविले होते. अशा ज्ञानवंत,बुद्धिवंत, आणि कीर्तीवंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ग्रंथप्रेमी आणि ग्रंथ वाचनामुळे संपूर्ण भारत देशाला समतेचा विचार देणारा एक महान नेता मिळालेला होता .
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.
बाबासाहेब चंपाबाई आनंदराव ढोबळे
बारामती
९३५६९०९००२
