NCT NCT बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृतीस समर्पित "समर्पण दिवस" कवठेमहांकाळ येथे भावपूर्ण वातावरणात साजरा

बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृतीस समर्पित "समर्पण दिवस" कवठेमहांकाळ येथे भावपूर्ण वातावरणात साजरा

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक चेतनेने भारावलेल्या दिव्य वातावरणात संत निरंकारी मिशनतर्फे युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ समालखा येथे भावपूर्ण संत समागमाचे आयोजन करण्यात आले. परम आदरणीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन सान्निध्यात पार पडलेल्या या समागमात देश-विदेशातील लाखो श्रद्धाळूंनी सहभागी होत सतगुरुंच्या अमृतमयी वचनांचा लाभ घेत आत्मिक शांती, आनंद आणि दिव्य प्रेरणेचा अनुभव घेतला.                                                                          यावेळी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी आपल्या आशीर्वचनांत सांगितले की, बाबा हरदेवसिंहजी यांचे संपूर्ण जीवन मानवता, सेवा आणि प्रेमाभक्तीचे जिवंत उदाहरण होते. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण ठरावा आणि प्रत्येक कृतीतून करुणा, मानवता व सद्भावना प्रकट व्हावी, हीच त्यांची शिकवण होती. प्रत्येकाने आपल्या अंत:करणात मानवी मूल्ये जोपासून निराकाराच्या आधाराने उद्देशपूर्ण जीवन जगावे, असा संदेश त्यांनी दिला.              ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित राहत नाही, तर ते संपूर्ण मानवतेच्या सेवेसाठी कल्याणासाठी वाहिले जाते, असेही सतगुरु माता जी यांनी स्पष्ट केले. खरी सेवा ही दिखाव्यापासून दूर असून ती प्रेम, विनम्रता आणि निःस्वार्थ भावनेने परिपूर्ण असते. तसेच खरी भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर विचार, आचरण आणि कर्मांतून प्रतिबिंबित होत असते, असे त्यांनी नमूद केले.                                                                            अमर संत अवनीतजी यांच्या समर्पित जीवनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, समर्पण हे केवळ भावनेत नसून जीवनाच्या प्रत्येक कृतीतून प्रकट झाले पाहिजे. गृहस्थ जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळतानाही संगत, सेवा आणि भक्तीला सर्वोच्च स्थान देत त्यांनी आदर्श जीवनाचा संदेश दिला.              समारोपात सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी आशीर्वाद देताना प्रत्येकाने सेवा, सुमिरण आणि सत्संग यांना जीवनातील सर्वोच्च प्राधान्य द्यावे, तसेच प्रत्येक हृदय निराकाराशी एकरूप होऊन प्रेम, शांतता आणि मानवतेचा संदेश समाजात पोहोचविण्याचे माध्यम बनावे, अशी प्रेरणा दिली.                           सांगली सेक्टर अंतर्गत शाखा कवठेमहांकाळ येथे आयोजित "समर्पण दिवस" सत्संग सोहळ्यात मिशनचे ब्रह्मज्ञान प्रचारक आदरणीय नवनाथ शेलार जी म्हणाले की मानवी जीवन समर्पित असायला हवे जसे हरदेवसिंहजी महाराजांचे होते. त्यांनी सत्संगाच्या माध्यमातून अनेक मुलांवरही संस्कार केले.त्यांनी रक्तदान ही मानवी समाजाला दिलेली अनमोल देण आहे
या समागमादरम्यान गीतकार, कवी आणि विचारवंतांनी आपल्या रचनांमधून मनोभावातील गहन अनुभूतींना शब्दबद्ध केले. प्रत्येक स्वर आणि प्रत्येक शब्दाने उपस्थितांच्या अंत: करणाला स्पर्श केला. काहींनी बाबाजींच्या दिव्य शिकवणींचा प्रेरणादायी संदेश दिला, तर काहींनी त्यांच्या सौम्य व्यक्तिमत्त्वाला, सेवाभावाला आणि मानव कल्याणासाठी केलेल्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.वक्त्यांच्या शब्दांतून बाबाजींच्या हृदयस्पर्शी प्रेमाचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटत होते. या कार्यक्रमास सांगली, मिरज, नरवाड, सलगरे, देशिंग, कवठेमहांकाळ, जत परिसरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.