NCT NCT पुणे येथील 'प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांच्या ‘सर्वसाक्षी‘ कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा करवीर नगरी कोल्हापूर येथे संपन्न

पुणे येथील 'प्रा. डॉ. रामचंद्र यादव यांच्या ‘सर्वसाक्षी‘ कविता संग्रहाचे प्रकाशन सोहळा करवीर नगरी कोल्हापूर येथे संपन्न

 

नवचैतन्य टाईम्स पुणे (प्रतिनिधी):-किसन वीर महाविद्यालय, वाई ( जि. सातारा ) येथून सेवानिवृत्त झालेले मराठीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. रामचंद्र यादव मूळचे आलेगाव , ता. सांगोला, जि. सोलापूर येथील राहणारे. सध्या त्यांचे वास्तव्य 'लिटल अर्थ' किवळे, पुणे ( पश्चिम ) या  ठिकाणी आहे. प्रा. डॉ. रामचंद्र यादव हे केवळ अध्ययन - अध्यापनच करीत राहिले नाहीत. तर ते नेहमीचे काम करता-करता अधूनमधून कविता, कथा, ललित निबंध इत्यादी प्रकारचे लेखन करीत राहिले.त्यांचा 'आराधना' हा कविता संग्रह यापूर्वीच   प्रसिद्ध झालेला आहे . त्यानंतर आता 'सर्वसाक्षी' या नावाचा त्यांचा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. या काव्यसंग्रहाचा  प्रकाशन सोहळा अन्य मराठी पुस्तक प्रकाशनाच्या बरोबरीनेच रविवार दिनांक १७ मे २०२६ रोजी के. एस. आय. प्रकाशन  संस्थेने  आयोजित केलेल्या  २९ व्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर - "करवीर नगर वाचन मंदिर, कोल्हापूर" येथे निमंत्रित प्रमुख  पाहुण्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या प्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष मा. मातृभक्त आचार्य शंकर घनश्यामदास अंदानी ( पुणे ) , उद्घाटक  मा. डॉ. मधुकर बाबुराव हुजरे ( धाराशिव ) , प्रमुख पाहुणे प्रसिद्ध कादंबरीकार मा. डॉ. श्रीकांत श्रीपती पाटील ( घुणकी ), संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा. कवी सरकार,  श्री. विलास पाटील (  इंगळी ) ,  दैनिक रोखठोकचे कार्यकारी संपादक  मा. डॉ. सुरेश राठोड ( कोल्हापूर) , काव्यसंमेलनाचे अध्यक्ष मा. श्री. सुधाकर बाबूराव शिंदे ( इचलकरंजी ) इत्यादी  निमंत्रित मान्यवर साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.  तर व्यासपीठासमोर सभामंडपात अनेक  मान्यवर मराठी कवी, कथाकार, कादंबरीकार, पत्रकार , रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सौ. प्रांजल शिंदे ( जयसिंगपूर ) , सौ. पुजा रणदिवे ( कोल्हापूर ) व तेजस्विनी रजपूत ( कोल्हापूर ) यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले.                                                       प्राध्यापक यादव  सरांनी त्यांच्या ‘आराधना’ मधील कविता प्रमाणेच ‘सर्वसाक्षी’ या संग्रहातील कवितामधूनही  आपल्या अंतःकरणातील  विविध भावानुभूतींचा प्रबळ आविष्कार केलेला आहे.येथे कौटुंबिक नातेसंबंधातील, स्त्री पुरुष यांच्या परस्पर संबंधातील प्रेमाच्या विविध छटांचा आविष्कार केलेला आहे.येथे प्रेम कविता आहेत तसेच निसर्ग कविताही आहेत .येथे विविध पातळीवरचे सामाजिक जीवनाचे चित्रणही  केलेले आहे .तसेच काही कवितांतून देशप्रेमाचाही आविष्कार केलेला आहे .यादव सरानी काही शृंगारिक लावण्याही  लिहिल्या आहेत .तसेच काही कवितांतून आपल्या अंतःकरणातील उत्कट भक्ती भावनेचा आविष्कार केलेला आहे .   त्यांच्या या आत्माविष्काराला सुंदर भावगीतांचे स्वरूप लाभले आहे.काही कवितांतून ग्रामीण जीवनातील व्यक्तिरेखांना जिवंत रूप प्राप्त करून दिले आहे .रसिक वाचक, साहित्यिक,जिज्ञासू संशोधक  या कविता संग्रहाचे मनापासून स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.                                                                                या संमेलनातच  ग्रंथ प्रकाशनाच्या बरोबरीनेच प्रा. डॉ.  रामचंद्र यादव यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘लोकनेते यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार‘  देऊन  सन्मानीत करण्यात आले. शेवटी  निमंत्रित पाहुणे, उपस्थित  मान्यवर,  निमंत्रित मान्यवर कवी , पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक , पत्रकार आणि श्रोते या सर्वांचे मा.सूत्रसंचालकांनी  आभार मानले व अशा रितीने हा सोहळा संपन्न झाला.