गुरुवारी प्रारंभ; राम चरितमानस कथा, रक्तदान शिबिराचे आयोजन तुकाराम बाबा महाराज यांची माहिती
नवचैतन्य टाईम्स जत प्रतिनिधी:- राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्य चिक्कलगी भुयार मठ येथे १० सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान श्री तुलसीदास कृत रामचरित्र मानस कथेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच बरोबर जत तालुक्यातील गोंधळेवाडी येथेही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोन्याळ येथील विठोबा घारळे, दादा काटे महाराज, शिवराय हाताळी महाराज, दत्ता सावळे संतोष चेळेकर , मल्लेश हाताळी गोरख घारळे, मच्छिंद्र घारळे उपस्थित होते.तुकाराम बाबा महाराज यांच्या दिव्य सानिध्यात दरवर्षी चिक्कलगी भुयार मठ व गोंधळवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. श्री संत बागडेबाबांचे विचार सर्वत्र पसरावेत त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदा पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील रामयणाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिक्कलगी भुयार मठ येथे श्री तुलसीदास कृत रामचरित्र मानस कथा आयोजित केली आहे. गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता आप्पा रामचंद्र माने, अमृत पाटील महाराज, शिवराय महाराज यांच्या हस्ते विणा पूजन होणार आहे. त्यानंतर दररोज पहाटे चार वाजता काकडा, सकाळी सहा वाजता बाबांची आरती, दुपारी १२ ते २ नेमाचे भजन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सहा वाजता बाबांची आरती, सायंकाळी सात ते दहा रामायण कथा, रात्री कीर्तन, जागर होणार आहे. रामायण कथा १० सप्टेंबरला मंगलाचरण व शिव पार्वती विवाह, ११ ला रामजन्म कथा, १२ ला अहिल्या उद्धार व सिता स्वयंवर, १३ ला सिता व राम विवाह,वनगमन आणि राम वनवास, १४ ला दशरथ प्राणज्योत गमन आणि भरत भेट, १५ ला सिता हरण व शबरी भेट, १६ ला लंका दहन, रावण वध व कथा समाप्ती तर १७ सप्टेंबरला सकाळी नऊ ते १२ दरम्यान रामयणाचार्य हभप ज्ञानेश्वर महाराज रासकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. याच दिवशी दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज, भारत खांडेकर पुजारी यांनी केले आहे.
■ दुष्काळ निवारण्यासाठी घालणार साकडे
जत व मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाची छाया गडद पसरली आहे. शेतकरी, पशुपालक संकटात आहे. परतीचा दमदार पाऊस पडू दे असे साकडे सप्ताह काळात घालण्यात येणार असल्याची माहिती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.

