NCT NCT ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक; कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस केंद्रां तर्फे सांगली जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक; कवठेमहांकाळ महामार्ग पोलीस केंद्रां तर्फे सांगली जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम

 नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी {रामचंद्र कोरे-माळी}:-हिवाळ्याच्या दिवसांत आणि ऊस गाळप हंगामात महामार्गावर होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलीस केंद्र, कवटे महांकाळ (जि. सांगली) यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील श्रीपती शुगर डफळापूर व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट न 04 तिप्पेहळी ता जत येथे कारखान्यांच्या ठिकाणी जाऊन विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली या मोहिमेअंतर्गत ऊस वाहतूक करणारे वाहने, त्यांचे चालक आणि मालक यांना वाहतुकी दरम्यान वाहनांना रिफ्लेक्टर (परावर्तक) लावण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.                             सदरची मोहीम माननीय पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, महामार्ग पोलीस केंद्र कवटे महांकाळचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्रीकृष्ण नावले व PSI साळवे, PSI पाटील, PSI वाघमोडे, Psi युवराज पाटील व पोलीस अंमलदार प्रदीप पाटील,सुहास स्वामी,विश्वास वाघमोडे,हर्षवर्धन पाटील यांनी यशस्वीपणे पार पाडली.

अपघातमुक्तीसाठी रिफ्लेक्टर काळाची गरज:

ऊस गाळप हंगाम सुरू झाल्याने महामार्गांवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रक यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या धुक्यामध्ये ही वाहने रस्त्याच्या कडेला उभी असताना किंवा संथ गतीने चालत असताना पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनांना ती दिसून येत नाहीत. यामुळे गंभीर आणि जीवघेणे अपघात घडतात. हे अपघात रोखण्यासाठी सर्व ऊस वाहतूकदार वाहनांना पाठीमागे आणि बाजूला चमकणारे रिफ्लेक्टर किंवा रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले.

रिफ्लेक्टरचे वाहतूकदारांना पटवून दिलेले फायदे:

• रात्रीच्या वेळी दूरवरून दृश्यमानता: रिफ्लेक्टरमुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकाला अंधारातही ऊस वाहतूक करणारे वाहन लांबूनच स्पष्टपणे दिसते.

• अपघातांपासून बचाव: वाहन वेळेत दिसल्यामुळे पाठीमागील चालकाला गाडीचा वेग नियंत्रित करण्यास किंवा बाजूने सुरक्षितपणे ओव्हरटेक करण्यास पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे संभाव्य अपघात टळतात.

• धुक्यामध्ये उपयुक्तता: हिवाळ्यातील सकाळी व रात्री पडणाऱ्या दाट धुक्यात रिफ्लेक्टर सुरक्षेचे कवच म्हणून काम करतात.

• जीवित व वित्तहानी टाळणे: एका छोट्याशा रिफ्लेक्टरमुळे स्वतःचा आणि रस्त्यावरील इतर निष्पाप नागरिकांचा मौल्यवान जीव वाचू शकतो.

या मोहिमेदरम्यान कवटे महांकाळ महामार्ग पोलिसांच्या पथकाने कारखान्यांवर प्रत्यक्ष भेट देऊन अनेक वाहनांना जागेवरच रिफ्लेक्टर लावले. तसेच, वाहतुकीचे नियम पाळण्याचे व वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस न भरण्याचे आवाहन वाहनचालकांना केले. या उपक्रमाचे साखर कारखाना प्रशासन आणि ऊस वाहतूकदार संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे."रस्ता सुरक्षा हीच आपली सुरक्षा" हा संदेश देत सर्व ऊस वाहतूकदारांनी आपल्या वाहनांना तातडीने रिफ्लेक्टर लावून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांनी केले आहे.