NCT NCT आला थंडीचा महिना..... शेकोटी पेटवा

आला थंडीचा महिना..... शेकोटी पेटवा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):-  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वार्यात वाढ झाल्याने,घाटमाथ्यावरील नागरिकांना आता बोचर्या थंडीला समोर जावे लागत आहे.काही भागात तर तुरळक पाऊसही होत आहे.तर पहाटे दाट धुक्याला समोर जावे लागत आहे 
घाटमाथ्यावर घाटनांद्रे, तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर,जाखापुर व कुची परिसरात गेल्या चार दिवसापासुन अचानक थंडीत वाढ झाली आहे.अगदी पहाटेपासूनच थंडीला सुरुवात होत आहे.या अचानक थंडीत वाढ झाल्याने लोकांना बोचर्या थंडीला समोर जावे लागत आहे.
सायंकाळी सहा नंतर तर हावेत गारवा निर्माण होण्यास सुरुवात होत आहे.चालूवर्षी घाटमाथ्यावर बर्यापैकी पाऊस झाल्याने अद्यापही सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.त्यामुळे ही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे.या बोचर्या थंडीमुळे नागरिकांना तसेच सकाळच्या सुमारास व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांना कठीण होत आहे.
त्यामुळे बाहेर पडताना कानटोपी,स्वेटर,मफलेर,शाली यांसारख्या उबदार वस्तूंचा आधार घ्यावा लागत आहे.या थंडीमुळे सकाळी लवकर व संध्याकाळ नंतर बाहेर पडणाऱ्यांची संख्या चांगलीच रोडावली आहे.अगदी सायंकाळी नंतर व पहाटे जागोजागी शेकोट्या पेटल्याचे दिसत आहे.
परंतु ही बोचरी गुलाबी थंडी मात्र रब्बी हंगामासाठी पोषक ठरत आहे.या थंडीमुळे परिसरातील शाळू,हरभरा,करडई,जवस यासारखी पिके मात्र जोमात आहेत.दिवसा कडाक्याचे ऊन, रात्री थंडी व पहाटे धुंके यांसारख्या बदलत्या वातावरणाचा मात्र मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होत असुन सर्दी,खोकला,ताप व अंगदुखी यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.