NCT NCT आता खेडेगावातही कॅशलेस व्यवहारांना वाढली पसंती;छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा

आता खेडेगावातही कॅशलेस व्यवहारांना वाढली पसंती;छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- संपूर्ण देशात सुरू असलेल्या डिजिटल पेमेंट इको सिस्टिममुळे आपल्या रोजच्या जगण्यातील व्यवहाराची पद्धतही सध्या बदलली आहे.कवठेमहंकाळ शहराप्रमाणेच तालुक्याच्या ग्रामीण भागातही चहावाले,किराणा दुकानदार, भाजीपालावाले,आईस्क्रीमवाले,भंगारवाले,चायनीज कॉर्नरसह इतर व्यवसायाबरोबरच मोठ्या शोरूममध्येही  'यूपीआय' द्वारे ऑनलाइन व्यवहारात सध्या वाढ होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.व्यवहारातील साध्या एक रुपयापासून हजारो रुपयांचे व्यवहार हे स्मार्ट पेमेंटद्वारे कॅशलेस करत आहेत. त्यामुळे सध्या घरात किंवा खिशातदेखील रोख रक्कम ठेवणे नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. 
       यामुळे आपसूकच शहरासह ग्रामीण परिसरात सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे.आता छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात आधारकार्ड वरून बँकेतील पैसे काढून दिले जातात.परंतु घरात मोबाइल सुविधा असल्याने वीज मीटरचे बिल,टेलिफोन बिल, ट्रॅव्हल कंपन्यांचे,विमानाचे वा रेल्वेचे तिकीट,सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील चहा वाले, किराणा दुकानदार,भाजीपाला विक्रेते,भंगार वाला, आईस्क्रीम वाले,चायनीज कॉर्नरसह इतर व्यवसायांसाठी ई पेमेंट वापर वाढला आहे.परिणामी,सुट्या पैशांचे टेन्शन आपसूकच दूर झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
        ऑनलाइन खरेदी विक्रीही वाढली असून या व्यवहारातही कॅशलेस व्यवहार केला जात आहे.ऑनलाइनरित्या एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचे पेमेंट ऑनलाइन अदा केले जात आहे. 
काय आहे 'यूपीआय' ? 'यूपीआय'  ही भारतीय पेमेंट सिस्टिम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ती विकसित केले आहे.त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी ओटीपीची गरज नाही.तुम्ही फक्त पिन टाकून,कोड स्कॅन करून सहज पेमेंट करता येते.त्यामुळे बहुतांश जण  'यूपीआय' चाच वापर करत असल्याचे दिसून येत आहे.