NCT NCT १४ जानेवारी पासून घाटनांद्रे येथे श्री यल्लमा देवीची यात्रा,ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

१४ जानेवारी पासून घाटनांद्रे येथे श्री यल्लमा देवीची यात्रा,ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- सालाबादाप्रमाणे याही वर्षी घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री यल्लमा देवीची यात्रा ही मंगळवार दिनांक १४ जानेवारी पासून भरणार असुन,यानिमित्ताने विविध प्रकारच्या धार्मिक,संस्कृतीक कार्यक्रमासह कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन केले आहे.तसा एकमुखी निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला.सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अमर शिंदे होते.
 मंगळवार दिनांक १४ जानेवारी रोजी देवीची बोनी व नैवेद्य होणार असुन, यादिवशी सायंकाळी पाच वाजता मास्टर जयसिंग व नृत्यतारका लता पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.तर बुधवार दिनांक १५ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस असुन यादिवशी सकाळी १० वाजता जयसिंग पाचेगावकर या़चाच पुन्हा तमाशाचा कार्यक्रम होणार आहे तर सकाळी ११ वाजता खाड्याच्या मेटा पासून सु्वाद्यासह‌ भव्य पालखी मिरवणूकीला सुरुवात होणार आहे.सदर पालखी गावतील प्रमुख मार्गावरून फिरुन व ठीकठिकाणी थांबून मानाचा आहेर स्वीकारत गावातील देवदेवतांच्या भेटी घेत किचाच्या मैदानाकडे जाणार आहे.या ठिकाणी विधीवत किचाच कार्यक्रम होऊन सदर यात्रेची सांगता होणार आहे.
तसेच याच दिवशी दुपारी तीन वाजता श्री यल्लमा देवीच्या मंदिरालगत असणाऱ्या कुस्ती मैदानात नामवंत मल्लासह अनेक लहानमोठ्या चटकदार कुस्त्या पहावयास मिळणार आहेत.
यात्रेची सांगता ही मावळत्या सूर्याच्या साक्षीने किचाच्या कार्यक्रमाने होणार आहे.तरी याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी,तमाशा रसिकांनी,कुस्ती शौकीनांनी व व्यापारीवर्गानी घ्यावा असे आवाहनही यावेळी यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी सरपंच अमर शिंदे, उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सर्वश्री दिलीप शिंदे,सागर शिंदे, अभिजित शिंदे,तंटामुक्तीचे कुलदीप शिंदे,सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे,पांडुरंग शिंदे (गुरुजी) सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.