नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी (रावसाहेब काळे):- पुणे रेव्ह पार्टी प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे. राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई या पार्टीमध्ये सापडले. डॉ. प्रांजल खेवलकर यांना छापेमारीत अटक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच या प्रकरणामध्ये डॉ. प्रांजल यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी खळबळजनक दावा केला आहे. डॉ. प्रांजल खेवलकर यांच्या नावाने सुरुवातीपासूनच असल्याने हे प्रकरण हायप्रोफाइल ठरले. सुरुवातीच्या कारवाईनंतर पोलिसांनी जाहीर केले होते, की हॉटेलच्या परिसरात आणखी तीन तरुणी दिसल्या होत्या; पोलिसांची कारवाई सुरू असल्याने त्या बाहेरूनच निघून गेल्या. न्यायालयातही ही माहिती देऊन त्यांचा शोध घेत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात आता पोलिसच सांगत आहेत, की या तिघींचा पार्टीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे केवळ संशय निर्माण करण्यासाठीच पोलिसांनी हा दावा केला होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा, ड्रग्जचा पुरवठादार अद्याप पोलिसांना हाती लागलेला नाही. कारवाईला तीन दिवस उलटून गेले, तरी ड्रग्ज नेमके कुठून आणले गेले आणि पुरवठादार कोण, याचा तपास अद्याप अंधारातच आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपताच कोर्टाने पुन्हा चौदा दिवसाची कोठडी चे आदेश दिले आहे.
