नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी (अनंत कुलकर्णी):-इंडियन नॅशनल हिल क्लाइंब चॅम्पियनशिपच्या पुणे क्वालिफायर्स फेरीत दमदार विजय मिळवत वर्चस्व गाजवल्यानंतर, पुण्याच्या त्रिमूर्ती रेसिंग टीमने नुकत्याच पार पडलेल्या लोकेश गौडा इंडियन नॅशनल ऑटोक्रॉस क्वालिफायर्स (INAC) स्पर्धेतही आपल्या भक्कम कामगिरीची चमक कायम ठेवली. या स्पर्धेत त्रिमूर्ती रेसिंग टीमने विविध वर्गांमध्ये अनेक वाहनांसह व अनुभवी तसेच नवोदित चालकांसोबत सहभाग नोंदवला. स्पर्धेच्या संपूर्ण कालावधीत उत्कृष्ट वेग, अचूक तंत्र आणि सातत्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर त्रिमूर्तीने प्रतिस्पर्ध्यांवर आपले वर्चस्व सिद्ध केले.शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी संघाने १४ पोडियम्स, तर रविवार, दिनांक १८ जानेवारी २०२५ रोजी १३ पोडियम्स, असे एकूण २७ पोडियम्स पटकावण्याचा उल्लेखनीय विक्रम नोंदवला. त्रिमूर्ती रेसिंग टीमकडून दमदार प्रदर्शन करणारे चालक पुढीलप्रमाणे... संजय लल्ल, वरुण लल्ल, मझद्यार वाच्छा, अंकुर मिरकळे, रवींद्र सिंग असी, श्वेत पवार, पिंकेश ठक्कर व प्राची गायकवाड.या यशानंतर मोटरस्पोर्ट्स क्षेत्रात पुण्याच्या त्रिमूर्ती रेसिंग टीमबद्दल कौतुकाची लाट उमटली असून संघाची सातत्यपूर्ण कामगिरी, तयारीतील काटेकोरपणा, संघभावना आणि जिद्द यांमुळे भारतीय मोटरस्पोर्ट्समधील त्रिमूर्तीचे स्थान अधिक भक्कम झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे.या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघ तसेच सर्व चालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून भविष्यातील राष्ट्रीय स्पर्धांमध्येही त्रिमूर्ती रेसिंग टीमकडून अपेक्षांची उंची वाढली आहे.
