NCT NCT ग्राहकांनी हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक राहिले पाहिजे - डॉ.विद्याधर किट्टद

ग्राहकांनी हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक राहिले पाहिजे - डॉ.विद्याधर किट्टद

 नवचैतन्य टाईम्स जत (प्रा. कुमार इंगळे):- ग्राहकांनी आपले हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक राहिले पाहिजे. ग्राहकांना शोषणमुक्त खरेदीसाठी सक्षम करणे आणि ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी व ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक पंचायत चळवळ काम करते, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, पुणे विभागाचे उपाध्यक्ष डॉ.विद्याधर किट्टद यांनी केले.                         ते मौजे रामपूर (जत) येथे राजे रामराव महाविद्यालय, जत च्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या "विशेष श्रमसंस्कार शिबिराप्रसंगी ग्राहक पंचायत चळवळ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री.आर.एम.तंगडी हे होते. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ गायकवाड उपस्थित होते. प्रारंभी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात विशेष श्रमसंस्कार शिबीराचा उद्देश सांगितला.                                                                   यावेळी पुढे बोलताना डॉ.किट्टद म्हणाले की, ग्राहक पंचायत समिती चळवळ व्याख्याने, चर्चासत्रे यासारखे उपक्रम राबवून जनजागृती करते. त्यामुळे ग्राहक स्वतःच्या हिताचे रक्षण करू शकतात आणि बाजारात पारदर्शकता आणू शकतात असे सांगून त्यांनी  ग्राहक चळवळीचा इतिहास, उद्दिष्टे व समाजातील त्याचे महत्त्व स्पष्ट करुन  ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांचे हक्क, तक्रार निवारण यंत्रणा, ऑनलाईन तक्रार पद्धती व ग्राहक न्यायालयांची भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.        कार्यक्रमाचे अध्यक्ष  व ग्राहक पंचायतीचे जेष्ठ कार्यकर्ते श्री  रामाणा तंगडी यांनी ग्राहक पंचायत ही ग्राहक जागृतीसाठी कशी प्रभावीपणे कार्य करते याची माहिती देऊन तिची कार्यपद्धती व समाजातील योगदान तसेच NSS स्वयंसेवकांनी सजग ग्राहक बनून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, ग्राहक हक्कांची माहिती समाजापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन केले. शेवटी कार्यक्रम अधिकारी डॉ.सोमनाथ गायकवाड यांनी आभार मानले.                                या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.पुंडलिक चौधरी, डॉ.सोमनाथ गायकवाड,  डॉ.गुरव सर, डॉ.मेहजबीन मुजावर मॅडम,  प्रा.कुमार इंगळे सर, पोलीस पाटील प्रविण निकम, सर्व प्राध्यापक, सर्व कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.