NCT NCT जायगव्हाण येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा

जायगव्हाण येथे गणेश जयंती सोहळा उत्साहात साजरा

नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी (अनंत कुलकर्णी):-जायगव्हाण (ता. कवठेमहांकाळ) –जायगव्हाण येथे श्रीगणेशपंत (दादा) खाडिलकर निर्मित श्री गणेश मंदिरात गणेश जयंती सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. हा सोहळा केवळ धार्मिक उत्सव न राहता कुटुंबातील एकजूट, आपलेपणाची भावना आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करणारा ठरतो.                         या प्रसंगी गावातील खाडिलकर कुटुंबासह सर्व ब्राम्हण समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्यवसाय व नोकरी निमित्त बाहेरगावी स्थायिक असलेले अनेक कुटुंबीय या दिवशी आवर्जून गावात येऊन गणेश जन्मसोहळ्यात सहभागी झाले. यामुळे गावात आनंद, भक्ती आणि एकोपा यांचे वातावरण निर्माण झाले होते. इतिहासाच्या पानांत डोकावल्यास, सांगली संस्थानचे पहिले अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन (इ.स. १७७५ ते १८५०) यांनी इ.स. १८०१ मध्ये सांगली नगरीची स्थापना केल्यानंतर सांगली संस्थानचे कुलदैवत असलेल्या श्रीगणेश मंदिरांचे बांधकाम इ.स. १८११ ते १८४५ या कालखंडात केल्याचा उल्लेख आढळतो. जायगव्हाण येथील या ऐतिहासिक श्री गणेश मंदिराची निर्मिती श्री. गणेशपंत (दादा) खाडिलकर यांनी इ.स. १८५५ च्या सुमारास स्वखर्चाने केली. या संदर्भाचा उल्लेख सांगली संस्थानचे संस्थापक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांच्या चरित्रात आढळून येतो.                                                  आज हे मंदिर केवळ एक वास्तू न राहता भक्ती, श्रद्धा, ज्ञान, आपलेपणा, एकजूट आणि नातेसंबंध दृढ करणारे एक शक्ती केंद्र बनले आहे. गणेश जयंतीसारख्या सोहळ्यांतून ही परंपरा पुढील पिढीपर्यंत जतन केली जात असल्याचे चित्र येथे पाहावयास मिळाले.