नवचैतन्य टाईम्स जत दि.22(प्रा. कुमार इंगळे):-प्रवासात मोबाईल पाहण्यापेक्षा पुस्तक सोबत ठेऊन पुस्तके वाचत जावा. मोबाईल पाहण्यामुळे डोळ्यांना त्रास होऊन ताणतणाव वाढतो. त्यापेक्षा चांगल्या चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्यास विचार समृद्ध होतील. तुमचे विचार समृद्ध झाले तरच तुम्ही विचार करायला शिकाल आणि विचार केला तरच तुम्ही उत्तम बोलायला शिकाल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे मराठी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ग्रंथालय समिती प्रमुख डॉ.लक्ष्मण भरगंडे व ग्रंथालय प्रमुख सौ.आशाराणी नरळे या होत्या. प्रारंभी मराठी विभागप्रमुख प्रा.कुमार इंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश सांगून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची व कार्यक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ.सुरेश पाटील पुढे म्हणाले की, ग्रंथालयाला "हार्ट ऑफ कॉलेज" समजले जाते पण विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल आल्यामुळे ग्रंथालयाचा वापर कमी झाला आहे.पण समाजात माणूसपण टिकवायचे असेल तर पुस्तके वाचली पाहिजेत.सोशल मीडियामुळे आपल्या ज्ञानात कोणत्याही प्रकारची भर पडत नाही उलट मानसिक ताणतणाव वाढतो.लेखन हे चिरकाल टिकणारे आहे जे चिरकाल टिकणारे आहे त्याचे वाचन करा. मराठी भाषा ही महाराष्ट्राचा आत्मा आहे. मराठीमध्ये लिहिले, वाचले तरच आपली मराठी भाषा टिकेल,तरच मराठी भाषेचे संवर्धन होईल, असेही ते शेवटी म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सदाशिव माळी यांनी तर शेवटी आभार प्रदर्शन डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. हे ग्रंथ प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व विभागप्रमुख प्रा. कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय प्रमुख सौ.आशाराणी नरळे, ग्रंथालय क्लार्क श्री.शिवराम मोईन पाटील व श्री.बिरु सदाकाळे यांनी परिश्रम घेतले.
