नवचैतन्य टाईम्स कराड (अँड. पंडित गायकवाड ):-कराड येथील शब्दवेध संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक २३रोजी महिला महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात “जगणे आनंदाचे” या विषयावर ज्येष्ठ वक्ते ॲड. सदानंद चिंगळे यांचे प्रभावी व्याख्यान संपन्न झाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना श्री. राजाभाऊ लाटकर यांनी शब्दवेधच्या प्रवासाची ओळख करून दिली.“येथे कोणी अधिकारी वा पदाधिकारी नसून सर्वजण कार्यकर्ते आहेत. साहित्याचा निखळ आनंद घेणे हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे,” असे त्यांनी सांगितले. संस्थापक मा.अरुण काकडे यांच्या हस्ते वक्ते ॲड. सदानंद चिंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सौ. देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. “जगणे आनंदाचे” या विषयावर बोलताना ॲड.चिंगळे यांनी जीवनातील आनंदाचा अर्थ विविध उदाहरणांतून उलगडून दाखवला. आनंद हा प्रत्येकाच्या जीवनप्रवासाचा हेतू असून तो शोधण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य, कला, निसर्ग, मानवी नाती आणि समाजातील मूल्ये यांमधून आनंद कसा शोधता येतो, याचे मार्मिक विश्लेषण त्यांनी केले. “जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीत; मात्र या प्रवासात आनंद शोधणे हेच खरे जगणे आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास शब्दवेध परिवारासह साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या वर्धापन दिन सोहळ्यामुळे साहित्यप्रेमींना विचारमंथनाची आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची नवी प्रेरणा मिळाली.
