NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगामासह बेदाणा निर्मितीही सुरु

कवठेमहांकाळ तालुक्यात द्राक्ष हंगामासह बेदाणा निर्मितीही सुरु

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- कवठेमहांकाळ तालुक्यात सध्या द्राक्ष हंगामासह बेदाणा निर्मितीही सुरू झाली आहे.परंतू सध्या त्यास म्हणावी तशी गती दिसून येत नाही.मालाला दरही चांगला भेटत आहे.बाजारपेठेत सध्या विविध जातींची द्राक्षे उपलब्ध झाली आहेत.त्यांना दरही चांगला मिळत आहे.त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी काही प्रमाणात का होईना समाधानी दिसत आहे.त्याचबरोबर द्राक्षावर प्रक्रिया करून बेदाणा निर्मिती करण्यासाठीचे बेदाणाशेडही रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची ते व्हाया नागज पुढे सांगोल्या पर्यंत थाटले गेले आहेत.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनीही बेदाणा निर्मितीसाठी माल देण्याची तयारीही सुरू केली आहे.चालूवर्षी थंडी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत वाढल्यामुळे बेदाणा हंगामीही आपसूकच पुढे सरकला आहे.बेदाणानिर्मीतीसाठी उष्ण व निर्भळ वातावरणाची गरज असते. कवठेमहांकाळ तालुक्यातील बळीराजाने नगदी पीक म्हणून द्राक्ष पिकाला मोठी पसंती दिल्याने तालुक्यात द्राक्षपीक क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.यावर्षी अगदी मे महीन्या पर्यंत पाऊस लांबल्याने द्राक्ष पिकाला लागणारे ऊनच न मिळाल्याने त्याचा फटका बसून द्राक्षाची काडी व्यवस्थीत परिपक्व झाली नाही त्याचा परिणाम द्राक्षपीकाच्या गर्भधारणेवर होऊन द्राक्ष माल निर्मीती कमी झाली आहे.त्यामुळे चालू वर्षी द्राक्ष उत्पादनच घटल्याचे दिसून येत आहे.सध्या द्राक्षे विक्रीयोग्य झाली असून,राज्यातील तसेच परराज्यातील द्राक्ष दलालही परिसरात दाखल झाले आहेत.द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून मात्र बागेमध्ये जागेवरच पण रोखीने द्राक्ष विक्री सुरू केली आहे.                                   सध्याच्या बाजार भावानुसार माणिक चमन जातीचे द्रक्षास २७० ते ३०० रुपये (चार किलो पेटी) दर मिळत आहे.सुपर सोनाका, बुलेट,अनुष्का,आर के,एस एस एन या द्राक्ष जातींना (चार किलो पेटी) ३०० ते ३५० रुपये दर मिळत असून निर्यातक्षम दर्जाच्या द्राक्षांना ३५० ते ४०० रुपये दर मिळत असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.काळ्या द्राक्षांना ३५० ते ४५० रुपये दर मिळत असून गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार होत आहेत. बेदाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्राक्षांना २२५ ते २७५ रुपये दर मिळत आहे.काही शेतकरी थेट बेदाणा निर्मितीकडे वळत आहेत.                          वाहतूक खर्च,औषधे व मजुरी वाढल्याने खर्चात वाढ झाली आहे.दर समाधानकारक असले तरी व्यापाऱ्याकडून होणारी फसवणूक व बाजारातील चढ-उतार लक्षात घेता शेतकरीराजा आपली सावध पावले टाकत आहेत.हंगामाच्या शेवटच्या टप्प्यातही चांगले दर टिकून राहावेत,अशी अपेक्षा द्राक्ष उत्पादकांकडून व्यक्त होत आहे.

फोटो :- घाटनांद्रे (ता कवठेमहांकळ) येथील विजय उर्फ बबलू शिंदे यांच्या बागेतील द्राक्ष मालाची विक्री सुरू झाली आहे.फोटो :- जालिंदर शिंदे