नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- जागतिक पातळीवरील इंधन,गॅसच्या तुटवड्याचे तीव्र पडसाद सध्या भारतीय अर्थव्यवस्थेवर पडत असुन, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.नागरिकांनी पेट्रोल, डिझेल जपून वापरावे,त्याच प्रमाणे सोने खरेदी करणे, परदेशी पर्यटन करणे रद्द करावे असे आवाहन देशवासीयांना त्यांनी केले आहे. याबाबत जनतेतूनही उलट-सुलट चर्चा होत असतानाच येणाऱ्या अधिकमासातील देवाणी-घेवाणीवरूनही चर्चेला सोशल मीडिया व चर्चेचे उधाण आले आहे. विशेषतः जावईबापूना आधीक मासात सोन्याची अंगठी घालण्याची असलेल्या परंपरेला यंदा पंतप्रधानांच्या आवाहनानुसार सासऱ्यांकडून ब्रेक लावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आज रविवार दिनांक १७ मे पासून अधिक मासस (पुरुषात्तम मास किंवा धोंड्याचा महिना) प्रारंभ होत आहे.हिंदू धर्मियांमध्ये या महिन्याला विशेष धार्मिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. या अधिक मासात जावयाचा अगदी मान राखण्यासाठी सासरकडून सोन्याची अंगठी किंवा इतर दागिने भेट देण्याची परंपरा आहे.मात्र यंदा पंतप्रधानांच्या आवाहनामुळे या परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.यावर्षी जावयांचा सुवर्णयोग हुकणार असे दिसत आहे.धोंड्याच्या महिन्यातच जावंयाना मानपान मिळते, त्यातही सोन्याची अंगठी बंद झाली तर जावायांचा सन्मान कसा होणार ? आणि दुष्काळात धोंडा महीना ही म्हण तंतोतंत जुळणार अशी मिश्किल प्रतिक्रिया अनेक जावयांकडून व्यक्त होत आहेत.सोशल मीडियावर देखील जावयांसाठी वाईट दिवस सुरू अधिक मासात सोन्याऐवजी स्टीलची अंगठी तर मिळणार का ? अशा विनोदी व बोचऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दुसरीकडे सासुर वाडीतील मंडळींमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
