सांगली -सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची निवडणुक मनी पॉवरवर रंगणार का परस्पर मॅनेज करुन खिशात घातली जाणार ? इतकीच उत्सुकता उरलेली आहे .
नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-सातारा आणि सांगली जिल्ह्यात प्रबळ असणा-या अजित पवार गटाने आणि शिंदेसेनेने विधानपरिषदेच्या आमदारकीची जागा स्वतः हुन भाजपच्या हवाली केल्याने राजकीय क्षेत्र हवालदिल झालेलं आहे . साता-यात जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत शिंदेसेना आणि राष्ट्रवादीने भलताच काटा केलेला होता . त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना भाजपने ता -ताणुन फाट्यावरती मारलेलं होतं . एका लुगड्यानं कुणी म्हातारं होत नाही असा गर्भित इशारा मंत्री शंभुराज देसाई यांनी त्यावेळी भाजपला दिलेला होता . सांगलीतही जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत शिंदेसेनेने भाजपच्या मनी आणि मसल पॉवरला कृष्णा नदीत जलसमाधी दिलेली होती . या जोरदार संघर्षानंतर शिंदेसेनेने आणि अजित पवार गटाने या आमदरकीच्या निवडणुकीत अत्यंत नाट्यमय रित्या यु टर्न घेतलाय . साता-यातील शिंदे गटाची शिवसेना अत्यंत सावधानतेने पाऊलं उचलत आहे तर सांगलीतील शिंदेसेना भाजपला पुन्हा एकदा पराभवाचे खडे चारण्या साठी खडाजंगीच्या पवित्र्यात आहे . गतवेळच्या आमदारकीच्या निवडणुकीत मोहनराव कदम यांच्या विरोधात साता-याचे शेखर गोरे यांची उमेदवारी मॅनेज करुन दिल्याची चर्चा होती .यावेळीसुध्दा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे . सांगली - सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेची आमदारकीची निवडणुक ही वरकरणी पक्षीय पातळीवरती लढली जात असल्याचे चित्र उभा केले जात असले तरी राजकारणाच्या या कॅनव्हासवर गटातटाचेच गडद चित्र आकाराला येत गेलंय हा आजपर्यंतचा अनुभव आहे . ही आमदारकीची जागा भाजपला शिंदेसेना आणि अजित पवार गटाने अगदी स्वस्तात दिल्यापासून महाविकास आघाडीत चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे .भाजपलाच ही जागा जावावी म्हणून महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू असल्याचीही चर्चा होती .महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाकडे गेल्याने उमेदवारीत चुरस वाढलेली आहे . कॉंग्रेस कडुन मयुर पाटील, मिरजेचे नगरसेवक संजय मेंढे यांची नांवे चर्चेत आणली जात असली तरी या दोघांचीही १०० कोटी रुपयांचा खुर्दा करण्याची आर्थिक ताकद नाही . भाजपकडून संग्राम देशमुख यांचेही असंच फाटकं गाणं असल्याचं बोललं जातंय आणि सम्राट महाडीक यांची भाजपने उमेदवारी जाहीर केली की राजकीय पटलावर भाजपविरोधात शिंदेसेना, दोन्ही राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीला सोबत घेऊन नवी फेरमांडणी करण्याची दाट शक्यता आहे . शरद पवार गटाला ही आमदारकीची जागा सुटल्याने आता माजी मंत्री जयंतराव पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील हे कोणती राजकीय खेळी करतात ? याकडे दोन्ही जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे . जयंतराव पाटील हे चिरंजीव प्रतिक पाटील यांच्यासाठी चाचपणी करत आहेत . जयंतराव पाटील गटाकडून कितीही इन्कार केला जात असला तरी उमेदवार हा जयंतराव,विशाल आणि विश्वजित यांच्यातील एक मतानेच ठरणार आहे .कुंडलचे महेंद्र लाड यांना एकदा आमदार करायचं असा कदम घराण्याच्या डोकीत फिट बसलंय .पण विश्वजीत कदम हे कायम इथं आमदार म्हणून प्रस्थापित असल्याने कुंडलच्या पाहुण्यांचे लाड पुरविणे विश्वजीत कदम यांना अजुन शक्य झालेलं नाही . जयंतराव पाटील आणि विश्वजित कदम यांना पलुस कडेगांवमधील राजकारण बळकट करण्यासाठी लाड घराण्याची गरज आहे .दरवेळी पतंगराव कदम यांना सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा लाड कुंडलचे जी. डी .बापू घराणे पुरवत होते पण शरद लाड यांनी भाजपच्या तंबुत घुसुन क्रांतीची मशाल विझवून उशाला घेतल्यानंतर इथली राजकीय समिकरणे बदललेली आहेत . शिंदे सेना आणि अजित पवार गटाने उचल खाल्ली तर महेंद्र लाड हे शरद पवार गटाकडुन आमदारकीचे उमेदवार म्हणून शड्डू ठोकुण उभा राहिले तर आश्चर्य वाटायला नको . सांगली आणि साता-याच्या राजकारणात काहीही घडू शकतंय शरद पवार गटाकडुन साता-याचे बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी दिली तर भाजपचे सम्राट महाडीक यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे .भाजपने सम्राटला आमदारकीचा शब्द दिला असल्याचे सांगितले जात असले तरी सम्राट महाडीक हे भाजपच्या धेय्य धोरणात तंतोतंत बसणारी उमेदवारी नाही असं बोललं जातंय . सांगली- सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या आमदारकीच्या निवडणुकीत तुमची भूमिका काय असणार? असा प्रश्न शिंदेसेना आणि अजित पवार गटाच्या काही दिग्गज नेत्यांना विचारला असता त्यांच्याकडून अर्थपूर्ण मौन बाळगले जात आहे . दुपारपर्यंत बरेच चित्र स्पष्ट होणार आहे . त्यांनतर ही निवडणूक मनी पॉवरवर सेटिंग केलेली आहे का थेट उमेदवारच मॅनेज करुन खिषात घातली जाते? हे उघड होईल . सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे दर वेळच्या निवडणुकीत छाती बडवुन विक्रमी विजयाचा दावा करणारे भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील हे या आमदारकीच्या निवडणुकीत कमालीचे चिडीचूप झालेत . त्यामुळे राजकीय विश्लेषकांच्याही भुवया उंचावलेल्या आहेत. दिवंगत नानासाहेब महाडिक यांना आपलेसे करून आमदार झालेले प्रभाकर घार्गे नंतरच्या निवडणुकीत ज्यादा पैसे खर्चावे लागतील म्हणून मागच्या अंगाला राहिलेले होते असं समजलं .यावेळच्या निवडणुकीचे चित्र काय ? असा प्रश्न केला असता ही आमदारकीची निवडणुक पैसेवानाची आहे अशी प्रतिक्रिया माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली .!!!
बाळासाहेब ल.पाटील
