नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून शेती विकासाला चालना मिळावी या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने अग्रण धुळगाव येथे बाजरी व मका बियाणे वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात महिला बचत गटांच्या सदस्यांसह शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शनिवार दि. २० जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मा. भंडारे साहेब, उपविभागीय कृषी अधिकारी मा. श्रीखंडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मंडळ कृषी अधिकारी शेंडगे साहेब व उपकृषी अधिकारी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये रेणुका महिला बचत गट, लक्ष्मी महिला बचत गट तसेच विजय शेतकरी उत्पादक गट यांना बाजरी व मका पिकांच्या सुधारित वाणांच्या बियाण्यांचे वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करणे आणि अधिक उत्पादन मिळविणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बीजप्रक्रियेचे महत्त्व, रोग व किडींपासून संरक्षण, संतुलित खत व्यवस्थापन, जलसंधारण, आधुनिक पीक पद्धती आणि अधिक उत्पादन देणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पेरणीपूर्व बीजप्रक्रिया केल्यास उगवण क्षमता वाढते तसेच रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादनात वाढ होते, असेही त्यांनी सांगितले. महिला बचत गटांनी शेतीपूरक व्यवसाय, सामूहिक शेती आणि कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक सक्षमीकरण साधावे, असे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांनी केले. शेतकऱ्यांनी विविध योजनांबाबत विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत कृषी विभागामार्फत उपलब्ध असलेल्या योजनांची माहितीही यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास सहाय्यक कृषी अधिकारी अजेटराव साहेब, सरपंच शिवदास भोसले, महाराष्ट्र शासन माजी वसुंधरा अभियान मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाचे सल्लागार श्रीधर कुलकर्णी तसेच कराड वाटेगाव येथून अग्रण धुळगाव पाहणीच्या भेटीसाठी आलेले मान्यवर व ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्य तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून कृषी विभागाच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केले.
