नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद):-महाबळेश्वर तालुक्यातील नावली गावात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलनाची घटना घडली. डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने शेती, रस्ते आणि परिसरातील काही घरांना धोका निर्माण झाला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करत धोकादायक परिसरातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. भूस्खलनग्रस्त भागाभोवती सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून नागरिकांना त्या परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तहसीलदार सचिन मर्के यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अफवा पसरवू नये, असेही त्यांनी सांगितले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाकडून परिसरावर २४ तास नजर ठेवली जात आहे. पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिक खबरदारी घेण्यात येत असून गरज पडल्यास आणखी नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
