नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):-कवठेमहांकाळ तालुक्यात उशिरा म्हणजे जुनच्या अखेरीस पेरणी पुरक पाऊस पडल्याने कुठे तरी खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली होती.तदनंतर जुलै महिन्याच्या मध्यानंतर पाऊस पडल्याने आता पेरणी कामाला वेग आला असून,आतापर्यंत उपलब्ध ओलीवर ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, पेरणीसाठी आवश्यक,पुरेसा पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकरी अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही दिवसांत समाधान कारक पाऊस झाल्यास उर्वरित पेरण्याही पूर्ण होतील.असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात यावर्षी जूनच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्या होत्या.दरम्यान,गेल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने आता पेरण्यांना वेग आला आहे. तालुक्यात खरीप हंगामाचे २१३७४ हेक्टर इतके पेरणी क्षेत्र आहे.यापैकी आतापर्यंत १५ हजार ४६ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.यामध्ये मका हे प्रमुख पीक असून ८,३९७ हेक्टर क्षेत्रावर त्याची पेरणी झाली आहे.त्यापाठोपाठ बाजरीचे ४,१०६ हेक्टर,उडीद ९९६ हेक्टर,भुईमूग ७२७ हेक्टर,खरीप ज्वारी १७२ हेक्टर, मूग ८० हेक्टर, तूर ४२ हेक्टर व सोयाबीन १७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अद्याप ढगाळ वातावरण असून काही भागात मध्यम तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. तालुक्याच्या घाटमाथ्या वरील घाटनांद्रे, जाखापूर, कुंडलापूर, तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,व कुची येथे झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने शेतकऱ्यांनी पेरणीला गती दिली आहे.पावसाने सातत्य राखले नसल्याने पिकांच्या उगवण व वाढीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.विहिरी,बंधारे व तलावात पाणीसाठा होण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही दमदार व मोठ्या पावसाची घाट माथ्यासह तालुक्यातील शेतकरी प्रतीक्षा करत आहेत.त्यानंतरच शेती,चारा व पिण्याचे पाण्याचा प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.सध्या पेरणी झालेले पीक व पेरणी क्षेत्र पुढीलप्रमाणे........
१) मका - ८३९७ हेक्टर.
२) बाजरी - ४१०६ हेक्टर.
३) उडीद - ९९६ हेक्टर.
४) भुईमूग ७२७ हेक्टर.
५) सोयाबीन १७ हेक्टर.
६) खरीप ज्वारी - १७२ हेक्टर.
७) तुर - ४२ हेक्टर.
८) मुग - ८० हेक्टर.
दिनांक २५ जुलै पर्यंत १५०४६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याचे नोंद आहे.जुलै अखेरीस आला तरीही तालुक्याच्या काही भागात अद्यापही खरीप हंगामाची पेरणी सुरू आहे.