राजे रामराव महाविद्यालयात नवागत विद्यार्थीचे उत्साहात स्वागत
नवचैतन्य टाईम्स जत (प्रा. कुमार इंगळे):- महाविद्यालयीन जीवन हा व्यक्तिमत्त्व विकासाचा सुवर्णकाळ आहे. योग्य दृष्टिकोन, सकारात्मक विचार आणि विविध उपक्रमांतील सक्रिय सहभाग यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध होते.आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव बिसले यांनी केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.कृष्णा रानगर हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्र.प्राचार्य कृष्णा रानगर यांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञानासोबत विज्ञान आणि सुसंस्कार यांची जोड आवश्यक असून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून ध्येयाकडे वाटचाल करा. महाविद्यालय तुमच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव पाठीशी उभे आहे, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या दैवतांना अभिवादन करून करण्यात आली. यानंतर द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थिनी जयश्री माळी व सोनाली सोनार यांनी नवागतांचे स्वागत करत आपल्या अनुभवांच्या माध्यमातून त्यांना महाविद्यालयीन जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांची माहिती डॉ.नारायण सकटे, डॉ.लक्ष्मण भरगंडे व डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी देत विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सकाळ सत्र प्रमुख तथा उपप्राचार्य डॉ.भिमाशंकर डहाळके यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्टाफ सेक्रेटरी डॉ.रामदास बनसोडे यांच्यासह सर्व विभागांतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सरस्वती बामणे यांनी तर श्रावणी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
