NCT NCT कवठेमहांकाळ तालुक्यात 'पाऊस आहे पण पाणी नाही' तलावातील पाणीसाठा 'जैसे थे' च

कवठेमहांकाळ तालुक्यात 'पाऊस आहे पण पाणी नाही' तलावातील पाणीसाठा 'जैसे थे' च

नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर (जालिंदर शिंदे):-पावसाळा अगदी मध्यावर आला तरीही कवठेमहांकाळ तालुक्यात एकही दमदार पाऊस न झाल्याने तलावातील पाणीसाठा हा अद्यापही जैसे थेच असल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामुळे संपूर्ण तालुक्याला दमदार पाऊसाची अद्याप प्रतिक्षाच आहे.अधूनमधून केवळ तुरळक पाऊस पडत असला तरी दमदार पावसा अभावी जलस्रोतांमध्ये अनपेक्षितपणे वाढ झालेली नाही.त्यामुळे तालुक्यात  'पाऊस आहे,पण पाणी नाही' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.सध्या तालुक्यातील ओढे,नाले, बंधारे हे कोरडे ठणठणीत आहेत.तर तलावातील पाणीसाठाही जैसे तेच आहे.                                                      तालुक्यातील कवठेमहांकाळ,  कुची, हिंगणगाव, ढालगाव व देशिंग या पाच महसूल मंडळांमध्ये सरासरी ५६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण पर्जन्यमानाची टक्केवारी ही ८५.३ टक्के असून, सरासरीच्या तुलनेत १५१.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.सध्या ढगाळ वातावरण  व हलक्या सरी सुरू असतात. तरी जलसाठ्यांमध्ये वाढ होण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर शेतीबरोबरच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष हे दमदार पावसाकडे लागून राहिले आहे.                                    तालुक्यातील दहा लघु व एक मध्यम प्रकल्प तलावापैकी तीन तलावात म्हैशाळ योजनेचे पाणी सोडण्याने तिथे पाणी वाढ आहे. उर्वरित आठ तलावातील पाणीसाठा हा 'जैसे थे' च असल्याचे चित्र आहे.त्यामुळे दमदार पाणीसाठ्याचा पाऊस कधी पडणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कवठे मंहाकाळ तालुक्याच्या दहा लघु व एक मध्यम प्रकल्पातील ३१ जुलै अखेर पाणीसाठ्याची सद्याचीस्थिती ही पुढीलप्रमाणे (पाणीसाठा द.ल.घ.फु. मध्ये)

१) कुची (२१.४८)

 २) रायवाडी (३५.५३) 

३) लांडगेवाडी (३.९४) 

४) लंगरपेठ (१०.००)

 ५) नांगोळे (१८.९६)

 ६) बोरगाव (४.१५)

७) हरोली (४.१९)

 ८) दुधेभावी (१८.५०) 

९) घोरपडी (९.९६)

१०) बंडगरवाडी (४७.३०) ११) बसप्पावाडी (१५२.६३)

तालुक्यात झालेला पाऊस हा (मिलिमीटर मध्ये)

दि.४ (१०.३) दि.५ (२.५) दि.६ (१०.०) दि.७ (३.४) दि.८ (७.६) दि.९ (१२.४) दि.१९ (९.२) दि.२०(६.८) दि.२३ (६.५) दि.२९ (२.६) दि.३१ (३.१)