नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर (विजय चौगुले):- माडग्याळ येथील महादेव मंदिर येथे पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या 'श्री बसव पुराण प्रवचन' सप्ताहाची सांगता अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आला . गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या ज्ञानयज्ञात परिसरातील माडग्याळ परिसरातील भाविकांनी दररोज हजेरी लावून श्रावण मासाचे पुण्य पदरी पाडून घेतले. पुराण समाप्तीच्या निमित्ताने संध्याकाळी जगद्गुरु महात्मा बसवेश्वर प्रतिमेची तसेच पवित्र बसव पुराण ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. 'महात्मा बसवेश्वर की जय', 'हर हर महादेव' आणि 'ॐ नमः शिवाय' च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून डोक्यावर कलश धारण करत मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीनंतर मुख्य मंदिरात शिवलिंगावर महापूजा करण्यात आली. बसवण्णांच्या विचारांची जनजागृती महिनाभर चाललेल्या या पुराणात श्री गुरु मदगोंडेशवर सिद्धसंस्थान मठ, संख येथील प्रशांत महाराज यांनी भगवान बसवेश्वरांच्या जीवन चरित्रावर आणि त्यांच्या 'कायकवे कैलास' (श्रम हाच कैलास) व 'सद्सद्विवेक बुद्धी' या तत्त्वांवर प्रकाश टाकला. "जात-पात विरहित समतावादी समाज निर्माण करण्यासाठी बसवेश्वरांनी दिलेला संदेश आजच्या युगातही किती महत्त्वाचा आहे," हे विविध दाखले देऊन त्यांनी पटवून दिले. महाप्रसादाचे आयोजन पुराण समाप्तीनंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाचा (माडग्याळ) परिसरातील भाविकांनी लाभ घेतला. गावातील तरुण मंडळ, ज्येष्ठ नागरिक आणि बसव पुराण माडग्याळ या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या धार्मिक उत्सवामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.


