नवचैतन्य टाईम्स राहुरी प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे एक अतिशय धक्कादायक आणि प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे.नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त शेतकरी तसेच पात्र लाभार्थ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या सानुग्रह अनुदानावरच डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार एका महिला तलाठी अधिकाऱ्याने केला आहे. शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करून तब्बल सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या महिला अधिकाऱ्याला अखेर गजाआड करण्यात आले आहे. मंगल रूपचंद दुशिंगे असे या अटकेत असलेल्या महिला ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठ्याचे नाव आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण अहिल्या नगर जिल्ह्याच्या महसूल वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षाच्या काळात मंगल रूपचंद दुशिंगे या राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे तलाठी या पदावर कार्यरत होत्या. याच काळात राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आपत्ती ग्रस्तांना दिलासा देण्यासाठी निधी आला होता. मात्र, या निधीचे वाटप करताना त्यांनी जाणीवपूर्वक नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. कोणत्याही प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचे पालन न करता त्यांनी अत्यंत बेकायदेशीररीत्या तब्बल ३ लाख ६५ हजार ३४० रुपये एवढ्या मोठ्या रकमेचे अनुदान भलत्याच ठिकाणी वितरित केले. या संशयास्पद आणि संपूर्ण गैरकारभाराच्या लेखी तक्रारी वरिष्ठांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत महसूल विभागाने तात्काळ एक विशेष चौकशी समिती स्थापन केली होती. या चौकशी समितीने कागदपत्रांची सखोल तपासणी केली असता, अनुदानाच्या वाटपात प्रचंड मोठी अनियमि तता आणि गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. शासकीय निधीचे जाणीवपूर्वक आर्थिक नुकसान करण्यात आल्याचे या सविस्तर अहवालात स्पष्ट झाले. चौकशी समितीच्या अहवालातील अत्यंत गंभीर निष्कर्ष पाहिल्यानंतर, जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशा नुसार तत्काळ कडक पावले उचलत कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यानंतर तत्कालीन तहसीलदार यांच्या सूचनेनुसार आणि त्यांनी प्राधिकृत केल्यावरून, मंडल अधिकारी विजय बबनराव बेरड यांनी अधिकृतरीत्या पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारे एप्रिल २०२६ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक, विश्वासघात आणि आर्थिक नुकसान केल्याच्या आरोपावरून विविध कलमांखाली रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी महिला अधिकारी रातोरात पसार झाल्या. पोलीस यंत्रणा सातत्याने त्यांच्या मागावर होती, मात्र तब्बल सहा महिने त्या पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरल्या. अखेर कायदेशीर कारवाईचा फास आवळला जात असल्याचे आणि सर्व मार्ग बंद झाल्याचे लक्षात येताच,५ सप्टेंबर २०२६ रोजी त्या स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्या. पोलिसांनी त्यांना तत्काळ ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आणखी एक मोठा धागा लागला आहे. या घोटाळ्याची पाळेमुळे केवळ एका गावापुरती किंवा तालुक्यापुरती मर्यादित नसून ती थेट जालना जिल्ह्यापर्यंत पोहोचल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. चौकशीत असे समोर आले आहे की, जालना जिल्ह्यातील काही शासकीय अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून त्यांनी तब्बल १२ लाख २४ हजार ८०२ रुपये इतक्या मोठ्या निधीचाही अपहार केला आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या पोलीस या कथित आर्थिक व्यवहारांचा आणि संगनमदाचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या कुशल नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तसेच पोलीस नाईक गणेश लिपणे हे या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास करत आहेत.
