NCT NCT लक्ष्मीतत्वा कडून महालक्ष्मीतत्वाकडे: "निस्वार्थ सेवेची एक भावस्पर्शी अनुभूती

लक्ष्मीतत्वा कडून महालक्ष्मीतत्वाकडे: "निस्वार्थ सेवेची एक भावस्पर्शी अनुभूती

नवचैतन्य टाईम्स वाई(प्रा. संभाजी लावंड):-गेल्या आठवड्यात एका दुपारी माझ्या घराबाहेरून फोन आला. मी दरवाजा उघडला, तर रंगाने काळी-सावळी असणारी एक स्त्री तिच्या मुलासह उभी होती. मी त्यांना आदराने आत बोलावून खुर्चीवर बसवले आणि आपुलकीने विचारले, "काय म्हणतात ताई?"              तीने हसतमुखाने उत्तर दिले, "ताई, माझे नाव योगिता. मी रजनीताईंकडे कामाला असते. तुम्ही त्यांच्यासाठी बनवलेली शेवभाजी त्यांनी मला खायला दिली होती; ती मला खूप आवडली. रजनीताईंनीच तुमचा नंबर दिला, म्हणून मी थेट तुमच्याकडे आले." पुढे काहीशा संकोचाने ती म्हणाली, "माझे घर अगदी लहान, एकाच खोलीचे आहे. येत्या गुरुवारी माझ्याकडे महालक्ष्मी बसणार आहेत. जागा कमी असल्यामुळे तिथे स्वयंपाक करणे शक्य होत नाही. तुम्ही मला शुक्रवारी २० लोकांचे जेवण आणि फराळ बनवून द्याल का?"    मी तिला तात्काळ फराळाचे पदार्थ बनवून देण्याचे कबूल केले; पण पूर्ण स्वयंपाकाबाबत जरा विचार करून सांगते म्हटले. तुझ्या रजनीताईंना त्या दिवशी अडचण होती म्हणून मी मैत्रीखातर स्वयंपाक केला होता. माझ्याकडे कामाला असलेल्या मावशीला विचारून, तिची मदत मिळाली तर नक्की हो सांगते, असे मी योगिताला स्पष्ट केले.पण, त्याच रात्री आठ वाजता  योगिता आणि तिचा मुलगा न कळवता पुन्हा माझ्या घरी आले. ती मला काही रक्कम ॲडव्हान्स म्हणून देऊ लागली. मी नम्रपणे नकार देत म्हटले, "मी कधीच ॲडव्हान्स घेत नाही. तुझा हा पैसा तुला दुसरीकडे कुठे गरजेचा असेल तिथे खर्च कर." त्यावर ती आग्रहाने म्हणाली, "अहो ताई, घ्या ना! आज माझ्या नवऱ्याच्या गॅरेजमध्ये पैसे आले आहेत. तुम्ही ठेवले नाही तर माझ्याकडून खर्च होऊन जातील. फराळाचे सामान मला नंतर द्या." मी पुन्हा तिला समजावले, "मला आता पैशांची गरज नाही. तुझ्या रजनी मॅडमला विचार, मी तिचे पैसे कधी आणि कसे घेतले होते." तिच्याकडून कसलीही पैशांची अपेक्षा न ठेवता, तिच्या चेहऱ्यावरचा अतिशय प्रामाणिक भाव पाहून माझे मन पाघळले. मी तिला जेवणही बनवून देण्याचे कबूल केले.                                                                     तिने सांगितले की, तिच्या ओळखीची एक व्यक्ती पुरणाचे मांडे करून देणार आहे, त्यासाठी मी फक्त पुरण तयार करून देणार आहे; आणि बाकीचे राहिलेले खीर, डाळीची आमटी, भात, भजी, कुरडया-पापड, छोलेची भाजी आणि पुरी असा २०-२५ लोकांचा स्वयंपाक शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत तयारकरुन द्या .  मी हो म्हटलं हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तो हजारो रुपयांपेक्षाही मोलाचा होता. ती सारखी विचारत होती, "ताई, किती पैसे होतील? मी थोडे थोडे करून पैसे देईन." मी तिला मायेने म्हणाले, "तु पैशांची अजिबात काळजी करू नकोस. आधी सगळ्यांना पोटभर जेवू घाल आणि निश्चिंत राहा!"                                                          दुसऱ्या दिवशी मी कामाच्या मावशीला ही सर्व हकीकत सांगितली. नेहमीप्रमाणे मावशी मला म्हणाली, "अगोदर पैसे ठरवले का? तु अगदी ''मोकळा पाटील'' आहेस! तुला कोणीही गोड बोलून सहज फसवू शकतं." मी मावशीची समजूत घालत म्हटले, "मावशी, असा विचार नको करू गं! एखाद्या चांगल्या माणसाने विनंती केल्यावर आपण नाही कसे म्हणणार? माणसाला त्याच्या वरच्या रंग-रूपावरून पारखायचे नसते. परमेश्वर कोणत्या रूपात येऊन आपली परीक्षा घेईल सांगता येत नाही. हे मी कालच देशपांडे सरांच्या मनाच्या श्लोकात वाचले आहे." यावर मावशी हसून म्हणाली, "जा बाई!                                                        शेवटी तुझ्या मनात आहे तेच तू करतेस." मावशीला विचारपूस करणे हा माझ्या मनात तिच्याबद्दल असलेला आदरच होता. माणसाने माणसाने थोडासा मान, मोठेपणा दुसऱ्याला दिला तर कुठे बिघडते? त्या  मुळे समोरच्या ला  बरं वाटतं आनंद  होतो परंतु हल्ली  कुणीच कुणाच  कौतुक करत नाही ,स्वतःच्या  कामाचं श्रेय दुसऱ्याला देत नाही, त्यामुळे आपला स्वतः चा कर्ता भाव वाढतो त्यामुळे अहंकार येतो.असो !         जर ठरल्याप्रमाणे गुरुवारी मी योगितासाठी सांजोरी, करंजी, लाडू आणि अनारसे हे फराळाचे जिन्नस तयार केले. शुक्रवारी सकाळी मावशीला थोडे लवकर बोलावून आम्ही आनंदाने पुरणपोळीचा उर्वरित स्वयंपाक सुरू केला—रव्याची खीर, आमटी, भात, छोले, भजी आणि पापड-कुरडयाभजी तळताना मी मावशीला म्हणाले, "अगोदर एक-दोन भजी खाऊन चव बघ." मावशी पटकन म्हणाली, "ताई, नैवेद्याचे अन्न आधी खाऊन उष्टे कसे करायचे?"                    मी तिला हसून समजावले, "मावशी, याला उष्टे करणे नाही म्हणत; त्यामागचा भाव पाहायचा असतो. देवाच्या नैवेद्यात सर्व जिन्नस, तिखट-मीठ योग्य आहे की नाही, हे पाहणे ही सुद्धा एक सेवाच आहे. शबरीनेसुद्धा रामाला गोड बोरे मिळावीत म्हणून प्रत्येक बोर चाखून पाहिले होते."अशा गप्पा मारत, प्रसन्न वातावरणात साडेअकरा वाजेपर्यंत पंचवीस-तीस लोकांचा स्वयंपाक तयार करुन झाला. योगिता सकाळी आली आणि बनवलेला स्वयंपाक पाहून तिचे डोळे भरून आले. ती थक्क होऊन म्हणाली, "ताई, तुम्ही एवढा स्वयंपाक बनवला? मला वाटले होते बंगल्यात राहणारी माणसे खूप कमी स्वयंपाक करतात. तुम्ही तर साक्षात अन्नपूर्णाच आहात! यात तर ३० ते ४० लोक आरामात जेवतील." मी तिला नम्रपणे म्हटले, "हा श्री माताजींचा प्रसाद समजून सर्वांना जेवू घाल, कमी अजिबात पडणार नाही.                                         "त्यावर योगिता भावूक होऊन म्हणाली, "ताई, खरं सांगू का? आमच्याकडे आरतीला खूप लोक येतात. मला स्वयंपाक जास्त हवा होता; पण तुम्ही रागवाल किंवा नाही म्हणाल या भीतीने मी १५-२० लोकांचेच सांगितले. पण तुमचा हा स्वयंपाक पाहून मला वाटते, महालक्ष्मीने माझी सर्व इच्छा पूर्ण केली." तिने पुन्हा पैशांचा विषय काढला, तेव्हा मी तिला म्हटले, "आधी रिक्षा आणून हे जेवण घरी घेऊन जा,  नैवेद्य दाखवून सर्वांना पोटभर खाऊ घाल, पैशांचे नंतर बघू."त्यावर योगिताने जे वाक्य उच्चारले, त्याने माझे मन हेलावून गेले. ती म्हणाली, "ताई, आज माझ्या महालक्ष्मींना तुमच्यासारख्या महालक्ष्मीच्या हाताचा नैवेद्य हवा होता, म्हणूनच त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले."                  तिचे हे शब्द ऐकून मी निशब्द झाले. तिच्या चेहऱ्यावरचा तो तृप्तीचा आनंद हाच माझा खरा आनंद होता. समाधान, समृद्धी, प्रेम आणि आदरातिथ्य हेच आपले खरे ''लक्ष्मीतत्व'' आहे; आणि या लक्ष्मीतत्वातून निर्माण होणारी निस्वार्थ दातृत्वाची भावना म्हणजेच ''महालक्ष्मी तत्व''!                                                          नंतर योगिताने  मुलींन सोबत रिक्षा पाठवून मी ते सर्व जेवण रिक्षेत  स्वताच्या हाताने व्यवस्थित ठेवुन ते तिच्या घरी पाठवले. मी घरात जाऊन श्री माताजींची पूजा केली, नैवेद्याचे ताट दाखवून आरती केली. अंतःकरणापासून श्री माताजींचे आभार मानले" श्री माताजी, कर्ता आणि करविता सर्व काही तुम्हीच आहात, मी तर केवळ निमित्तमात्र आहे. आज तुम्ही मलाही या महालक्ष्मी तत्वाची अनुभूती दिली. लक्ष्मीच्या एका हाताने घेणे आणि दुसऱ्या हाताने देणे, म्हणजेच प्राप्त परिस्थितीत समाधानी राहून इतरांना निस्वार्थपणे देणे, हीच भावना आमच्या ठायी सदैव वाढीस लागू दे." हिच आपल्या श्री चरणी प्रार्थना व कोटी कोटी प्रणाम!🙏

जय श्री माताजी-

💐💐💐💐 

सौ. कविता विजय साळुंके

चाळीसगाव 9834037392