ज्येष्ठ पत्रकार सुनिल गंगाराम कांबळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
साधी राहणी आणि पत्रकारितेवर निष्ठा
सुनिल काबळे यांचे शिक्षण पांचगणीतील नामांकित सेंट पीटर्स हायस्कूलमध्ये झाले. लहानपणापासूनच त्यांना वाचनाची आणि लिखाणाची आवड होती. याच आवडीतून ते पत्रकारितेकडे वळले. गेली अनेक वर्षे त्यांनी दैनिक 'सकाळ' मध्ये पांचगणी आणि परिसरातील प्रश्न, समस्या, निसर्ग, पर्यटन आणि येथील लोकांच्या भावना अत्यंत प्रामाणिकपणे मांडल्या. त्यांची बातमी म्हणजे केवळ बातमी नसायची, तर ती पांचगणीच्या मातीशी असलेल्या त्यांच्या नात्याची जाणीव करून देणारी असायची.
रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा
पत्रकारिता ही त्यांची ओळख असली तरी ते केवळ बातम्यांपुरते मर्यादित नव्हते. रोटरी क्लब ऑफ पांचगणीचे ते एक सक्रिय आणि निष्ठावान सदस्य होते. रोटरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेतला. गरजूंना मदत करणे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे यासाठी ते नेहमी पुढे असायचे.
सर्वांशी जुळवून घेणारा स्वभाव
सुनिल काबळे यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शांत आणि मनमिळाऊ स्वभाव. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असायचे. त्यांचे बोलणे इतके गोड होते की समोरची व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नसे. मान-सन्मान देणे हा त्यांचा स्थायीभाव होता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाशी ते अत्यंत आपुलकीने वागत. वाद-विवादापासून ते नेहमी दूर राहिले. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. त्यांना व्यायामाची प्रचंड आवड होती. सकाळी नियमित फिरायला जाणे, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणे हा त्यांचा दिनक्रम होता. झाडा-फुलांवर त्यांचे विशेष प्रेम होते. पांचगणीच्या टेबल लँडपासून ते घनदाट जंगलापर्यंत प्रत्येक ठिकाण त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. फोटोग्राफी ही त्यांची केवळ छंद नव्हती, तर ती एक साधना होती.
मोठ्या व्यक्तींशी संपर्क पण पाय जमिनीवर
राजकीय क्षेत्रात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांशी त्यांची जवळीक होती. क्रिकेटचे दिग्गज सुनिल गावस्कर यांच्यासोबतचे त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेत असायचे. मोठमोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे संबंध होते, मात्र त्यांनी कधीही त्याचा गर्व केला नाही. ते नेहमी जमिनीवर पाय ठेवून वागले. म्हणूनच पांचगणीमध्ये त्यांची एक वेगळीच आणि आदराची ओळख निर्माण झाली होती.आज ते आपल्यात शारीरिक रूपाने नसले तरी त्यांनी टिपलेले पांचगणीच्या निसर्गाचे फोटो, त्यांनी लिहिलेल्या बातम्या आणि त्यांनी जपलेली माणुसकी कायम आपल्या सोबत राहील.पाचगणीच्या या सुपुत्रास, या निसर्गपुत्रास आमची भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.भावपूर्ण श्रद्धांजली !
