नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी{रामचंद्र कोरे-माळी}:-दिल्ली, ५ ऑक्टोबर २०२६ :संत निरंकारी मिशनचा ७९वा वार्षिक संत समागम २३ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ या ठिकाणी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे. या समागमात प्रत्येक पाऊल मानवकल्याणाच्या दिशेने अग्रेसर होईल, प्रत्येक भाव समर्पणात परिवर्तित होईल आणि प्रत्येक हृदय प्रेमाच्या त्या दिव्य ज्योतीने प्रकाशित होईल, जी मानवतेला एकत्व, सद्भावना आणि प्रभुभक्तीच्या सूत्रात बांधण्याचा संदेश देते. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन सान्निध्यात हा संत समागम प्रेम, सेवा, सद्भावना आणि मानव एकतेच्या दिव्य भावनेचा संदेश देणार आहे. या पावन समागमाची शुभवार्ता मिळाल्याने श्रद्धाळू भक्तांची हृदये आनंद, उत्साह आणि प्रभुप्रेमाच्या अनुपम अनुभूतीने प्रफुल्लित झाली आहेत .अंतर्मनात जेव्हा प्रभूचा प्रकाश जागृत होतो, तेव्हा जीवनाची दिशाच बदलून जाते. सेवेमध्ये समर्पण, सुमिरणा मध्ये शांती आणि सत्संगामध्ये सत्याची अनुभूती होऊ लागते. हीच आत्मिक चेतना आणि ब्रह्मज्ञान मनुष्याला प्रेम व प्रभुभक्तीच्या मार्गावर पुढे घेऊन जाते. याच अंतर्मनातील प्रकाश आणि चेतनेच्या नवजागरणाची दिव्य अनुभूती देणारा यंदाचा वार्षिक निरंकारी संत समागम श्रद्धाळू भक्तांसाठी एक अनुपम आध्यात्मिक यात्रा ठरणार आहे. या वर्षीच्या संत समागमाचा प्रेरणादायी विषय आहे – ‘जागृती’.या दिव्य उत्सवाच्या तयारीचे कार्य श्रद्धा, समर्पण, निष्ठा आणि निःस्वार्थ सेवा-भावनेने अत्यंत उत्साहात सुरू आहे. वय, वर्ग आणि सामाजिक पार्श्वभूमीच्या सर्व सीमा ओलांडून श्रद्धाळू भक्त तन-मनाने सेवाकार्यात तल्लीन झाले आहेत. पहाटेच्या पहिल्या किरणापासून ते संध्याकाळच्या मावळत्या प्रकाशापर्यंत समागम स्थळाचा प्रत्येक कोपरा सेवा, भक्ती आणि समर्पणाची जिवंत अनुभूती देत आहे. कोणी बांधकामाच्या कार्यात सहकार्य करत आहे, कोणी शामियाने उभारण्याच्या व सजावटीच्या सेवेत व्यस्त आहे, तर कोणी स्वच्छता, पाणी व्यवस्था आणि भोजन सेवेचे कार्य सुव्यवस्थित करण्यासाठी कार्यरत आहे. त्याचबरोबर वार्षिक निरंकारी संत समागमाच्या भव्यतेची झलक देणारे मुख्य प्रवेशद्वारही आकार घेत आहे. हे प्रवेशद्वार प्रेम, समरसता आणि आत्मिक एकत्वाच्या दिशेने पुढे जाणाऱ्या पावलांचे प्रतीक बनून श्रद्धाळूंचे स्वागत करणार आहे.सेवेचे हे अद्भुत दृश्य त्या समर्पणाची साक्षात अभिव्यक्ती आहे, जे सद्गुरूच्या ज्ञानामुळे हृदयात जागृत होते. खरे तर जेव्हा सेवेमध्ये निःस्वार्थ भाव आणि समर्पणाची भावना जोडली जाते, तेव्हा प्रत्येक क्षण जणू आनंद आणि उत्सवाच्या अनुभूतीने भरून जातो. सेवा-भावनेची ही अनुपम छटा पाहिल्यावर सहजच जाणवते की, सेवेकऱ्यांच्या चेहऱ्यावर परिश्रमाचा थकवा नसून समाधान आणि समर्पणाची दिव्य आभा झळकत आहे. त्यांच्यासाठी सेवा हे केवळ एक कर्तव्य नसून सद्गुरूविषयीचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे. हाच तो आत्मिक आनंद आहे, जो निःस्वार्थ सेवा, भक्ती आणि सद्गुरूच्या छत्रछायेखाली जीवनाला आतून प्रकाशित करतो.सद्गुरू माता जी आपल्या प्रवचनांमधून सातत्याने सेवा, सत्संग आणि प्रभुस्मरणाचे महत्त्व सांगत प्रेरणा देतात. त्या म्हणतात –
‘तन पवित्र सेवा किये, धन पवित्र दिये दान,
मन पवित्र हरि भजन सों, त्रिबिध होई कल्याण।’ अर्थात, जेव्हा तन सेवेमध्ये, धन परोपकारामध्ये आणि मन प्रभुभक्तीमध्ये समर्पित होते, तेव्हाच जीवनात खऱ्या कल्याणाचा आणि आत्मिक शांतीचा मार्ग प्रशस्त होतो. समागमात सहभागी होणाऱ्या श्रद्धाळू भक्तांच्या सुविधेसाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुयोग्य पद्धतीने करण्यात येत आहेत. सेवा, सत्कार आणि आपुलकीची हीच भावना प्रत्येक श्रद्धाळूला सन्मान, सौहार्द आणि आत्मीयतेने परिपूर्ण वातावरणाचा अनुभव देईल
निः संशयपणे, हा संत समागम केवळ एक आयोजन नसून मानवता, समरसता आणि एकत्वाचा अनुपम उत्सव आहे. विविध संस्कृती आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आलेले श्रद्धाळू येथे ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भावनेला साकार करत सद्गुरूंच्या अमृतवाणीने आपल्या अंतर्मनाला प्रकाशित करतात.प्रेम, शांती आणि मानव एकतेच्या या दिव्य महापर्वामध्ये प्रत्येक बंधू-भगिनी आणि सज्जन भक्तांचे मनःपूर्वक हार्दिक स्वागत आहे.





