NCT NCT कवठेमंहाकाळ तालुक्यातील देशिंग -हरोली येथील कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांची तिफणच्या ' जागर कवितेचा 'अध्यक्षपदी निवड

कवठेमंहाकाळ तालुक्यातील देशिंग -हरोली येथील कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांची तिफणच्या ' जागर कवितेचा 'अध्यक्षपदी निवड

नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-त्रैमासिक तिफण, तिफण डिजिटल आणि भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद आयोजित ‘जागर कवितेचा’या राज्यस्तरीय ऑनलाइन कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षपदी सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध  कवयित्री मनीषा पाटील- हरोलीकर यांची निवड करण्यात आली आहे. तिफणच्या वतीने नवरात्रात गेली पाच वर्षे हा उपक्रम अविरत सुरू असून यंदा सहाव्या वर्षात त्याने पदार्पण केले आहे. या उपक्रमात राज्यभरातील शंभरहून अधिक कवयित्रींना व्यासपीठ मिळाले आहे.                मनीषा पाटील-हरोलीकर या देशिंग-हरोली येथील श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अध्यापिका आहेत. ‘पायवाटेवरील दिवे’, ‘मातीविश्व’, ‘नाती वांझ होताना’ हे त्यांचे कवितासंग्रह, ‘आभाळाच्या गावी’ हा बालकवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या ‘नाती वांझ होताना’ या संग्रहाचा समावेश पुणे विद्यापीठाच्या एम.ए. अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.त्यांना भि. ग. रोहमारे पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार, कवी केशवसूत वारसदार पुरस्कारासह एकूण २२ राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. बडोदा येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून त्यांनी कविता सादर केली आहे.ग्रामीण संवेदना आणि स्त्री अनुभव मांडणाऱ्या कवयित्रीला अध्यक्षपद मिळाल्याने या जागराला अधिक उंची मिळाली असल्याचे तिफणचे संपादक प्रा. डॉ. शिवाजी हुसे आणि परिषदेचे प्रा. डॉ. सर्जेराव जिगे यांनी सांगितले.                                                            या उपक्रमाच्या समन्वयक माधुरी चौधरी व ज्योती सोनवणे यांनी सांगितले की, गेली पाच वर्षे आम्ही नवरात्रात मातृशक्तीचा सन्मान म्हणून हा काव्यजागर चालवत आहोत. ग्रामीण भागातील आणि नवोदित कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळावे हा यामागचा उद्देश आहे. मनीषा पाटील-हरोलीकर यांसारख्या जमिनीशी नाळ जोडलेल्या कवयित्री अध्यक्षस्थानी असणे हे या चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.