जत तालुक्यातील शिक्षकांच्या व संस्थाचालकांच्या भेटीदरम्यान आवाहन
नवचैतन्य टाईम्स जत(प्रा. कुमार इंगळे):-नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. माध्यमिक व महाविद्यालयीन स्तरावर शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कौस्तुभ गावडे हे शिक्षकांचे प्रश्न जाणणारे उमेदवार आहेत. त्यांच्या कुटुंबातच शिक्षकांची परंपरा आहे. स्वतः कौस्तुभ गावडे यांनी सुमारे सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत कार्यरत असल्यामुळे त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची आणि शिक्षण क्षेत्रातील विविध अडचणींची प्रत्यक्ष जाण आहे, म्हणून शिक्षकांची वेदना जाणून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मा. कौस्तुभ गावडे यांना विजयी करा. असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विद्या समिती प्रमुख व पुणे शिक्षक मतदार संघाचे प्रचार प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी केले. ते पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार मा.कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे यांच्या प्रचारासाठी जत तालुकात शिक्षकांच्या व संस्थाचालकांच्या भेटी दरम्यान बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ.सुरेश पाटील, आजिव सेवक व माजी मुख्याध्यापक कृष्णा बिसले, राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य कृष्णा रानगर, माजी प्राचार्य डॉ.शिवाजीराव बिसले, सिद्राम चव्हाण, डॉ.शिवाजी कुलाळ, उपप्राचार्य भिमाशंकर डहाळके, प्रा.कुमार इंगळे, डॉ.मल्लाप्पा सज्जन उपस्थित होते. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची समृद्ध परंपरा पुढे नेण्यासाठी शिक्षण क्षेत्राला सक्षम आणि प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले कि, आज शिक्षण क्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. अनुदानित शाळा, संचमान्यता, शिक्षकांची रिक्त पदे, अनुदान, शिक्षक भरती, जुनी पेन्शन योजना तसेच पवित्र पोर्टल यांसारखे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांची प्रभावीपणे सोडवणूक करण्यासाठी व शिक्षण क्षेत्राला सक्षम करण्यासाठी सर्व शिक्षक मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने मतदान करून कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत द्यावे आणि त्यांना विजयी करून विधान परिषदेत पाठवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे नियमितीकरण गरजेचे
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. महाविद्यालयीन स्तरावर शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त आहेत. सध्या ४० टक्क्यांपेक्षाही कमी शिक्षक भरती झालेली असून सुमारे ६० टक्के पदे रिक्त असल्याचे चित्र आहे. या रिक्त पदांवर अनेक शिक्षक तासिका तत्त्वावर काम करीत आहेत. अनेक शिक्षक गेल्या १५ ते २० वर्षांपासून तासिका तत्त्वावर कार्यरत असूनही त्यांच्या सेवेला स्थैर्य मिळालेले नाही. अशा शिक्षकांचे नियमितीकरण करण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्यासाठी कौस्तुभ गावडे प्रयत्नशील राहतील, असा विश्वास श्रीराम साळुंखे यांनी व्यक्त केला.
