नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद ):-सातारा जिल्ह्यात विविध गुन्हेगारी घटनांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने बातम्या प्रसारित होत असून, त्या अनुषंगाने प्रशासन व पोलीस यंत्रणा तात्काळ कारवाई करत असल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. मात्र सध्या जिल्ह्यात एका गंभीर विषयाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. ही चर्चा म्हणजे जिल्ह्यात सुरू असलेल्या कथित बोगस डॉक्टर व अनधिकृत चिकित्सा केंद्रांबाबतची आहे. काही ठिकाणी नवीन डॉक्टरांचे प्रमाणपत्र लावून सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेषतः महिला रुग्णांच्या उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी संशयास्पद प्रकार सुरू असल्याची चर्चा समाजामध्ये होत आहे. तसेच, काही मेडिकल दुकानांमध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने तसेच संबंधित आरोग्य विभागाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, काही बोगस डॉक्टर अतिशय चलाख पद्धतीने नवीन डॉक्टरांची प्रमाणपत्रे भिंतीवर लावून तपास यंत्रणांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मा. जिल्हाधिकारी व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या विषयावर विशेष लक्ष केंद्रित करून जिल्हाभर तपास मोहीम राबवावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.
