नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):- “पाचगणी येथे बकरी ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, शांततेत आणि भाईचाऱ्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मशिदी आणि ईदगाहमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली. नागरिकांनी देशात सुख, शांती आणि सलोखा कायम राहावा यासाठी प्रार्थना केली. पाचगणी, जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि एकोप्यासाठी ओळखली जाते, येथे सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन प्रत्येक सण उत्साहाने साजरा करतात. बकरी ईद निमित्त नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत प्रेम, एकता आणि बंधुभावाचा संदेश दिला. बाजारपेठेत आणि शहरात सणाचा उत्साह पाहायला मिळाला. सण शांततेत पार पडावा यासाठी प्रशासन आणि पोलिस विभागाकडून कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सातारा जिल्हा पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जामा मशिदीचे मौलाना फजल अहमद यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “इस्लाम धर्मामध्ये आम्हाला अशी शिकवण दिली आहे की, आपल्या मुळे कोणालाही त्रास होऊ नये याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. पैगंबरांच्या जगात येण्याचा उद्देश हा मानवतेचा, प्रेमाचा आणि सर्वांच्या भावना जपण्याचा होता. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आणि शांततेने राहावे.” तसेच त्यांनी सांगितले की, “आपण ज्या देशात राहतो त्या देशातील कायद्याचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.” बकरी ईदच्या निमित्ताने पाचगणी शहरात प्रेम, सद्भावना आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर चित्र पाहायला मिळाले.
