नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी(रामचंद्र कोरे-माळी):-संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन (रजि.) दिल्ली, शाखा-महाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथील सभागृहात आयोजित रक्तदान शिबीरामध्ये 100 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन स्वेच्छेने रक्तदान केले. त्यामध्ये 22 स्त्री रक्तदात्यांचाही समावेश होता. उल्लेखनीय आहे, की निरंकारी भक्तांच्या सेवा भावनेने प्रेरित होवून इतर रक्तदात्यांनीही या शिबिरात उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. तर शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी महाड पंचायत समिती विद्यमान सभापती श्रीमती प्रेरणा जितेंद्र सावंत यांनी संत निरंकारी मिशनच्या सामाजिक कार्याविषयी प्रशंसा करताना म्हणाल्या, की निरंकारी मिशनचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. उल्लेखनीय आहे की त्या स्वतः निरंकारी सेवादलाच्या सदस्य आहेत. या शिबिराचा शुभारंभ निरंकार प्रभू प्रति प्रार्थना करून करण्यात आला. स्थानिक सेवादल युनिट संचालकांनी प्रास्ताविकमध्ये सांगितले कि, संत निरंकारी मिशन हे निराकार ईश्वराचे ज्ञान देणारे मिशन आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, फ्री मेडिकल कँप, वननेस-वन सारखे सामाजिक उपक्रम राबवणे एवढीच संत निरंकारी मिशनची ओळख नाही. तर, समयाच्या सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्याकडून निराकार ईश्वराची प्राप्ती केल्यावर मनुष्य जीवनात ईश्वराची भक्ती सुरू होते व ती मोक्ष मुक्तीसाठी साधन बनते या गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला. संत निरंकारी मिशनच्या झोन खरसई (रायगड) 40-अ चे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी या प्रसंगी बोलताना संत निरंकारी मिशन ही ईश्वराची अनुभूती, तसेच समाजकल्याण आणि निस्वार्थ सेवा यांना समर्पित अशी एक जागतिक आध्यात्मिक व मानवतावादी चळवळ आहे. 'मानवाची सेवा हीच ईश्वराची खरी भक्ती आहे,' या आदर्शाची प्रचिती घेणे हे या मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. मानवमात्राच्या सेवेसाठी रक्तदान हे सर्व श्रेष्ठदान आहे. संत निरंकारी मिशन अध्यात्मिक जनजागृती बरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे कार्य अविरतपणे करत आहे असेही त्यांनी सांगितले. निष्काम सेवा आणि समर्पणाचे प्रेरणादायी उदाहरण प्रस्तुत करत या शिबिरामध्ये 100 निरंकारी भक्ताने उत्साहाने रक्तदान केले. रक्त संकलनाची प्रक्रिया रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढी अलिबाग वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक गोसावी यांच्या माध्यमातून पार पडली. त्यांची मोठी टीम यावेळी उपस्थित होती. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये महाड नगरपरिषद उपनगराध्यक्ष संदीप जाधव, राजिप माजी सदस्य जितेंद्र सावंत यांचा देखील समावेश आहे. स्थानिक सेक्टर संयोजक दयाळ पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिरामध्ये सेवादल युनिट नं. 357 महाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित सर्व रक्तदात्यांचे रक्तपेढी कडून प्रमाणपत्र व संत निरंकारी मिशनकडून निरंकारी साहित्य देऊन आभार मानण्यात आले.
