नवचैतन्य टाईम्स कराड प्रतिनिधी(नौशाद भाई सय्यद):- कराड शहर व तालुक्यात वाढत्या वाहतूक बेशिस्तीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब नागरिकांनी समोर आणली आहे. नागरिकांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक वाहनचालक डाव्या बाजूने वाहन चालविण्याचे नियम पाळत नसून भरधाव वेगाने वाहने चालवत आहेत. तसेच अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसत असून ट्रिपल सीट प्रवासाच्या घटनाही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. रस्त्यांच्या कडेला अव्यवस्थित वाहन पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी केली असून कराड शहर व तालुक्यात वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भरधाव वेग, चुकीचे पार्किंग, अल्पवयीन वाहनचालक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस दलाची संख्या वाढवून प्रमुख चौकांमध्ये नियमित तपासणी मोहीम राबविण्यात यावी, जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळेल, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात आली आहे.कराड शहरातील वाढत्या वाहनसंख्येच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची भावना आहे.

