नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर( विजय चौगुले):- तालुक्यात रविवारी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पतीला दीर्घायुरारोग्य लाभावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून सुवासिनींनी वडाची मनोभावे पूजा केली. ग्रामीण भागात सणवार, व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. सावित्रीने आपल्या पतीला परत आणण्यासाठी वटवृक्षाखाली बसून कठोर तपश्चर्या केली. यामुळे यमराजाला तिचा पती परत द्यावा लागला. अशी ही सत्यवान सावित्रीची कथा आहे. या कथेच्या आधारेच आजही वटपौर्णिमेला महिला वटवृक्षाची पूजा करतात. रविवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये महिलांनी वडाच्या झाडाची पूजा केली. सुवासिनी साजशृंगार करून हातामध्ये पूजेसाठी लागणारे साहित्य घेवून जाताना दिसत होत्या. वटवृक्षाजवळ केळी, फणसाचे गरे, आंबा, धामण जांभुळ आदींसह विविध प्रकारची फळे ठेवून झाडाला हळदी कुंकू लावून पूजा करून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळून त्याभोवती प्रदक्षिणा घालत जन्मोजन्मी हाच पती मिळावा,अशी प्रार्थना करीत होत्या.सुवासिनी एकमेकींना हळदी कुंकू लावून वाण वाटत होत्या.

