नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कवठेमहांकाळ तालुका वीज ग्राहक हक्क समितीच्या वतीने नवीन स्मार्ट मीटर बंद करून पूर्वीप्रमाणे जुने डिजिटल मीटर बसविण्याची मागणी करत महावितरणचे उपअभियंता पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संजय कोळी, दिलीप पाटील, रमजान मुल्ला, किरण जमगे सुनील पाटील, मौला आतार, शहेन शहा मुल्ला, सागर पाटील,विकास खोत,अनिस मुल्ला यांच्यासह बहुसंख्य वीज ग्राहक उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, कवठेमहांकाळ तालुक्यात महावितरणकडून मोठ्या प्रमाणावर नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांमध्ये विविध शंका व अडचणी निर्माण झाल्या असून, त्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. समितीने स्मार्ट मीटरची सखोल तपासणी करून ग्राहकांना त्याबाबत संपूर्ण माहिती देण्याची मागणी केली आहे. तसेच ग्राहकांच्या हिताचा विचार करून नवीन स्मार्ट मीटर बंद करून पूर्वीप्रमाणे जुने डिजिटल मीटर बसविण्यात यावेत, अशा सूचना संबंधित महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, यापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट मीटर विरोधात मंजूर झालेल्या ठरावावर पुढे काय कारवाई करण्यात आली, याबाबतचा लेखी अहवालही सादर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सामान्य वीज ग्राहकांच्या अडचणी लक्षात घेऊन या निवेदनाची तातडीने दखल घेऊन ग्राहकहिताचा निर्णय घ्यावा. अन्यथा दिनांक ७ जुलै २०२६ रोजी कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा वीज ग्राहक हक्क समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
