सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी यांनी कवठेमहांकाळसारख्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्यासाठी कर्तव्यदक्ष व खंबीर व खमक्या अधिकारी दिल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याने कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख पोलीसिंगचा आदर्श निर्माण केला आहे.
नवचैतन्य टाईम्स कवठेमहांकाळ प्रतिनिधी (रामचंद्र कोरे-माळी):-कोणत्याही पोलीस ठाण्याची खरी ओळख तेथील शिस्त, पारदर्शक कारभार आणि नागरिकांना मिळणारा न्याय यावर अवलंबून असते. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सूत्र हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी आपल्या कर्तव्यदक्ष नेतृत्वाने पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीत लक्षणीय बदल घडवून आणले आहेत. अल्पावधीतच त्यांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखत नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे. पोलीस ठाण्यातील अंमलदारांमधील गटबाजी आणि अंतर्गत मतभेद दूर करून संघभावनेने काम करण्याची संस्कृती त्यांनी रुजवली. प्रत्येक अधिकारी कर्मचारी एकाच उद्दिष्टाने काम करत असल्याने पोलीस ठाण्याची कार्यक्षमता वाढली असून त्याचा थेट फायदा नागरिकांना होत आहे.पोलीस निरीक्षक कांबळे यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे पीडिताला न्याय. महिला असो किंवा पुरुष, कोणत्याही तक्रारदारावर अन्याय होऊ नये यासाठी प्रत्येक प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्पक्ष निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. केवळ कायदा-सुव्यवस्थेपुरतेच नव्हे, तर पोलीस ठाण्याच्या भौतिक सुविधांमध्येही त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. अंमलदार कक्ष, कार्यालय, पोलीस निरीक्षकांची केबिन तसेच संपूर्ण पोलीस ठाण्याचे सुशोभीकरण करून ते आकर्षक व नागरिकाभिमुख बनविण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी प्रवेशद्वाराजवळ स्वच्छ आणि थंडगार आर.ओ. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून हा उपक्रम नागरिकांकडून कौतुकास पात्र ठरत आहे. अवघ्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी कवठे महांकाळ तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत केली. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करत अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात त्यांनी यश मिळवले. केबल चोरी, घरफोडी, बेकायदेशीर शस्त्रसाठा (रिव्हॉल्व्हर) यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करून गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण केला. त्यामुळे तालुक्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. पोलीस निरीक्षक कांबळे यांनी सर्वसामान्य नागरिक, पत्रकार, डॉक्टर, वकील, लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनांशी समन्वय साधत लोकाभिमुख पोलीसिंगची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन कायदा-सुव्यवस्था राखण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय मानला जातो.
क्राइम डायरीच्या दृष्टीने पाहिले तर, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे हे केवळ गुन्हेगारांचा कर्दनकाळ नसून सर्वसामान्य जनतेसाठी न्याय, विश्वास आणि सुरक्षिततेचे प्रतीक ठरत आहेत. त्यांच्या कार्याचा हा प्रवास भविष्यातही अशाच यशस्वी वाटचालीकडे नेणारा ठरो, हीच अपेक्षा
