NCT NCT पाचगणीची ओळख धोक्यात? पर्यटनस्थळांवरील अतिक्रमणामुळे निसर्गसौंदर्याला बाधा

पाचगणीची ओळख धोक्यात? पर्यटनस्थळांवरील अतिक्रमणामुळे निसर्गसौंदर्याला बाधा

नवचैतन्य टाईम्स पाचगणी प्रतिनिधी (नौशाद भाई सय्यद ):- जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेले पांचगणी हे थंड हवेचे पर्यटनस्थळ, दर्जेदार शिक्षण संस्था आणि चित्रपट चित्रीकरणासाठी ओळखले जाते. "शिक्षणाचे माहेरघर" अशी ओळख असलेल्या या शहरात दरवर्षी देश-विदेशातून हजारो पर्यटक भेट देतात.                                                                        मात्र, सध्या पांचगणीतील काही प्रमुख पर्यटनस्थळांवर रस्त्यांच्या कडेला प्लास्टिकची तात्पुरती दुकाने उभारली जात असून,काही ठिकाणी घोड्यांच्या चाऱ्याचे (कडबा- कुट्टीचे) गोदामही उभारण्यात आले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याची भावना पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेषतः पांचगणी खिंड, खर रोड, पारशी पॉईंट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन परिसरातील निसर्गरम्य वातावरण हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. मात्र या भागांतील वाढते अतिक्रमण, अनियोजित दुकाने आणि अस्वच्छतेमुळे पांचगणीची जागतिक प्रतिमा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.     पर्यटनस्थळांचे नैसर्गिक सौंदर्य जपण्यासाठी संबंधित प्रशासनाने अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करून परिसर स्वच्छ व सुशोभित ठेवावा,अशी मागणी नागरिक आणि पर्यटकांकडून होत आहे."निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो की रस्त्यांवरील अतिक्रमण?"असा प्रश्न आता अनेकांकडून उपस्थित केला जात आहे.